२२ नोव्हेंबरला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. महाराष्ट्रातला सत्तापेच काही केल्या सुटत नाही असेच चित्र आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबरला मातोश्रीवर सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमके काय ठरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Maharashtra: Shiv Sena Chief Uddhav Thackeray (file pic) has called a meeting of party MLAs on November 22 at his residence in Mumbai. pic.twitter.com/cedlRoTygC

— ANI (@ANI) November 19, 2019

२३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला लोकांनी कौलही दिला. मात्र महाराष्ट्रातला सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. भाजपाला १०५ जागा मिळाल्या तर शिवसेनेला ५६ खरंतर १६१ आमदार जिंकलेले असताना महायुतीचं सरकार येणं अगदीच सोपं होतं. मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवंच या अटीवर शिवसेना अडून बसली आणि भाजपा शिवसेनेचा काडीमोड झाला.

यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचेही प्रयत्न होत आहेत. मात्र राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागली आहे आणि भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. तर शिवसेना खासदार संजय राऊत हे रोज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे सांगत आहेत. खरंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार येईल असं वाटलं होतं. मात्र शरद पवार यांनी सोनिया गांधींची भेट घेतल्यावर जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेवर चर्चाच झाली नसल्याचं सांगितलं. तसंच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं.

शरद पवारांनी ही गुगली टाकल्यावर शिवसेनेतली अस्वस्थता वाढली आहे. अशात आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी २२ नोव्हेंबरला शिवसैनिकांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.