राजकीय मैत्र, युतीधर्माचीही कसोटी

दयानंद लिपारे, कोल्हापूर</strong>

गणेश उत्सवाची धूम सुरु असताना कोल्हापुरात राजकीय धामधूम उडाली. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नवी बांधणी, नवी समीकरणे याला वेग आला. युतीत तणाव निर्माण झाला. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक – काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील दोस्ताना विधानसभेसाठी नव्या पायवाटा निर्माण करीत आहे. याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापासून भाजपच्या अवघ्या प्रमुखांना हे युतीधर्माला बाधक असल्याची जाणीव करून द्यावी लागली. म्हाडा, पुणेचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी कागलमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडल्याने ही जागा असलेल्या शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अवघा महाडिक परिवार भाजपच्या एकाच झेंडय़ाखाली आला आणि भाजपची ताकद वाढली. महाडिक – पाटील संघर्षांचे नवे पर्व रंगणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीने कोल्हापूर जिल्ह्य़ावर शिवसेनेचे वर्चस्व असल्याचे दाखवून दिले. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही जागा जिंकल्याने शिवसेनेचे बाहू आणखी फुरफुरू लागले आहेत. याचवेळी गेल्या लोकसभेला जमलेला मंडलिक – पाटील यांच्यातील मैत्रीचा दुसरा अंक सुरू झाला असून राजकीय पटलावर त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने विधान परिषद सदस्य असलेल्यांना उमेदवारी द्यायची नाही, असा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे काँग्रेसचे जिल्ह्य़ातील एकमेव आमदार सतेज पाटील विधानसभेच्या आखाडय़ात येण्यापूर्वीच शांत झाले. कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत गतवेळी झाली तेव्हा महाडिक यांना १ लाख ५ हजार ४८९ मते मिळाली होती. तर पराभूत सतेज पाटील यांना ९६ हजार ९६१ मते  मिळाली होती. आता त्यांनी आपल्याऐवजी पर्याय म्हणून पुतणे ऋतुराज संजय पाटील यांची उमेदवारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून जाहीर केली आहे. यानिमित्त त्यांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. लोकसभेवेळी काँग्रेसचे पाटील यांनी ‘आमचं ठरलंय’ असे घोषवाक्य घेऊ न धनंजय महाडिक यांच्या विरोधात आणि मंडलिक यांच्या बाजूने उघड प्रचार केला होता. अर्थात, मंडलिक यांना दिल्लीवारी करण्यासाठी तो फायदेशीर ठरला. याची जाणीव असल्याने मंडलिक यांनी यावेळी ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा शब्द मेळाव्यात दिला.

भाजप – मंडलिक वाद

मंडलिक यांची पाटील यांना मदत करण्याची भाषा भाजपला बोचली नसती तरच नवल. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या अडीच लाख मतांमुळे मंडलिक यांचा विजय झाला आहे, अशा शब्दांत सतेज पाटील यांचा, विजयाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी ‘लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सर्वाची मोट बांधली म्हणून संजय मंडलिक जिंकू शकले, हे कोणी विसरू नये,’ असे म्हणत मंडलिक यांना युतीधर्माची आठवण करून दिली. भाजपने शाब्दिक हल्ला केला असला तरी तूर्तास मंडलिक यांच्या भूमिकेत फारसा फरक पडलेला नाही. याचे पडसाद कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात उमटणार हे निश्चित. यावेळी अमल महाडिक यांचा किल्ला उघडपणे लढवण्यासाठी चुलत बंधू धनंजय महाडिक असणार आहेत. धनंजय महाडिक यांना दिल्लीत महत्वाचे पद देण्याचा शब्द चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. यामुळे धनंजय महाडिक भाजपची ताकद वाढवण्याच्या कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाला पाटील कारणीभूत असल्याने त्यांना हरवणे हे त्यांचे मुख्य लक्ष्य असणार आहे. तर, पाटील यांना मंडलिक गटाची ताकद मिळणार असल्याने त्यांच्यातही उत्साह दुणावला आहे. लोकसभेतील यशापयशाची समीकरणे नव्याने आकाराला येताना राजकीय मैत्र आणि युतीधर्म याचीही कसोटी लागणार आहे.

महाडिक – पाटील संघर्ष कायम

महाडिक आणि पाटील गटातील वाद प्रामुख्याने सहकार क्षेत्रातील आहे. महाडिक यांच्या ताब्यातील गोकुळ दूध संघाच्या गैरव्यवहाराची प्रकरणे धसास लावण्याचा सपाटा पाटील यांनी लावला आहे. सहकारातील हा वाद दोन दिवसांपूर्वी पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत सत्तारूढ माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कारभाराला सतेज पाटील यांनी आव्हान दिले. सभेचे पाचच मिनिटांत बारा वाजले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने सभेचा आखाडा झाला. याचे पुढचे पर्व गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उमटणार हे नक्की. त्यामुळे सभा विधानसभा निवडणुकीनंतर घेण्याचे घाटत आहे. त्यावरून पाटील गटाने सत्तारूढ गटातने सभेपूर्वी हाय खाल्लय़ाची टीका करण्यास सुरुवात केली आहे.

कॉंग्रेस ‘सतेज’ होणार?

कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी रातोरात पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अपक्ष लढण्याची भाषा करणारे आवाडे भगव्याकडे वाटचाल करीत आहेत. त्यांची पावले पाहून खासदार संजय मंडलिक यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यावर आवाडे अद्याप काही बोलले नाही. तोवर कॉंग्रेस पक्षाने जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर सोपवली आहे. मरगळ आलेल्या कॉंग्रेसला ‘सतेज’ करण्याचे आव्हान पाटील कितपत पेलतात हे निवडणुकीतील मतांचे आकडे आणि आमदारांची संख्या दाखवून देईल.

कागलचे रण तापले

चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने कागलच्या शाहू उद्योग समूहाचे नेते समरजीत घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. चार वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा कागलला येऊन गेले. कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या विरोधात घाटगे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवण्याचे काम फडणवीस यांनी केले आहे. त्यानुसार शुR वारी घाटगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. मोठे शक्ती प्रदर्शन केले. ही बाब शिवसेनेचे उमेदवार, माजी आमदार संजय घाटगे यांना रुचली नाही. ‘कोणी निवडणुकीला उभे राहणार असेल तर रोखणार नाही. गेल्यावेळी अत्यल्प मतांनी पराभूत झालो आहे. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा असून तो कदापि सोडला जाणार नाही. उद्धव ठाकरे योग्य तोच निर्णय घेतील’, असे म्हणत त्यांनी आपली उमेदवारी प्रबळ असल्याचा दावा लोकसत्ताशी बोलताना केला.