निवडणुकांचे निकाल लागून महिना होत आलाय. एकीकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या ‘महाविकासआघाडी’नं सत्तास्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, आज (शुक्रवारी) मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसंच पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच शनिवारी ‘महाविकासआघाडी’चे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Live Blog

17:52 (IST)22 Nov 2019
मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाला पवारांकडून प्राधान्य

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घ्यावी यासाठी शरद पवार आग्रही आहेत असं समजतं आहे. जर उद्धव ठाकरे यांनी नकार दिला तर संजय राऊत यांच्या नावाला पवारांनी पसंती दर्शवली आहे 

17:48 (IST)22 Nov 2019
महाविकास आघाडीकडून आजच दावा?

महाविकास आघाडीकडून आजच सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. राजभवन परिसरात पोलिसांची लगबग वाढली असल्याचं वृत्त आहे. आता काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे 

17:35 (IST)22 Nov 2019
नेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने पक्षातील आमदारांची बैठक घेतल्यानंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांची नेहरू सेंटरमध्ये सरकार स्थापनेसंदर्भात अंतिम बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, संजय राऊत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेते बैठकीमध्ये सहभागी झाले आहेत.

15:27 (IST)22 Nov 2019
महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही : नितीन गडकरी

महाविकासआघाडीचं सरकार टिकणार नाही, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. महाविकासआघाडी विचारधारांवर आधारित नाही. दोन्ही वेगळ्या विचारसरणींचे पक्ष आहेत, असं मत गडकरी यांनी व्यक्त केलं.


15:04 (IST)22 Nov 2019
शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसंच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी काँग्रेसची बैठक सुरू आहे. विधानभवनात ही बैठक पार पडत आहे. 

14:16 (IST)22 Nov 2019
मित्रपक्षांचं दोन्ही काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी समर्थन

मित्रपक्षांनी दोन्ही काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी समर्थन दिलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मित्रपक्षांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर सत्ता स्थापनेसाठी समर्थन असल्याचं घटकपक्षांकडून सांगण्यात आलं. 

14:13 (IST)22 Nov 2019
थोड्याच वेळात अंतिम निर्णय : उद्धव ठाकरे

थोड्याच वेळात सत्तास्थानेबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. काही वेळातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांची एकत्रित बैठक पार पडणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

13:43 (IST)22 Nov 2019
“शरद पवार अजितदादांनाच कळले नाहीत, मला काय कळणार?”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संपर्क साधत दोन्ही बाजू सांभाळण्याची जबाबदारी शरद पवार यांनी अत्यंत हुशारीने पार पाडली आहे.

13:36 (IST)22 Nov 2019
आज सत्तास्थापनेचा दावा करणार नाही

शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनंही घटकपक्षांची बैठक बोलावली आहे. त्यातच त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. दरम्यान, आज आपण सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी दिली.

12:40 (IST)22 Nov 2019
उद्धव ठाकरे यांचा निर्णय अंतिम : प्रताप सरनाईक

आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. आम्ही कोणीही मुंबईबाहेर जाणार नाही. सर्व आमदार हे मुंबईतच राहतील. सत्तेच्या वाटाघाटी सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस वगळून कोणाचाही फोन आला नाही, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. 

12:28 (IST)22 Nov 2019
शिवसेनेचे आमदार मुंबईतच राहणार

शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतच एकत्र राहणार आहेत. ते जयपूरला जाणार नाहीत.  लवकरात लवकर सत्ता स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदारांकडून देण्यात आली आहे. मातोश्रीवर पार पडललेल्या बैठकीनंतर आमदारांकडून प्रतिक्रिया देण्यात आली.

12:11 (IST)22 Nov 2019
उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं

उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं, अशी मागणी शिवसेना आमदारांनी बैठकीदरम्यान केली असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच त्यांच्या नंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांचं नावही आघाडीवर असल्याची माहिती आहे.

11:40 (IST)22 Nov 2019
मुख्यमंत्रीपदाचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील -राष्ट्रवादी

महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन होण्याच्या दिशेने सध्या राज्यात हालचाली सुरू आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चर्चाही अंतिम टप्प्यात आली आहे. पण, मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावरून अनेक तर्कविर्तक लावले जात असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

11:39 (IST)22 Nov 2019
माझी राष्ट्रवादीसोबत जाण्याची इच्छा नव्हती : बच्चू कडू

माझा विचार होता शिवसेना भाजपाची युती आहे आणि त्यांचंच सरकार येईल. माझं राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नव्हती. आता जे काय होईल ते राज्याच्या भल्यासाठी आहे असं समजून पुढे जायचं. शपथविधी होईपर्यंत शरद पवार कुठे जातील हे माहित नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.

11:08 (IST)22 Nov 2019
शिवसेना आमदारांच्या बैठकीला सुरूवात

मुंबईत शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आमदारांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील सर्व शिवसेनेचे आमदार मोतोश्रीवर दाखल

11:02 (IST)22 Nov 2019
संजय राऊत लिलावती रूग्णालयात

संजय राऊत हे लिलावती रूग्णालयात दाखल झाले आहे. नियमित तपासणीसाठी ते लिलावतीमध्ये दाखल झाले असल्याची माहिती समोर आली आहे. 

10:51 (IST)22 Nov 2019
माझ्या नावाची चर्चा नाही : राऊत

मुख्यमंत्रिपदासाठी संजय राऊत यांचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर स्पष्टीकरण देत आपल्या नावाची चर्चा नसल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली. तसंच उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं असंही ते म्हणाले.

10:13 (IST)22 Nov 2019
"आता इंद्रपद दिलं तरी माघार नाही"

आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही, अशी कठोर भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली. शिवसेनेनं स्वाभिमानानं घेतलेला हा निर्णय असल्याचे राऊत म्हणाले.


09:53 (IST)22 Nov 2019
शिवसेनेचा मुख्यमंत्री पाच वर्ष असेल

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल आणि यावर तिन्ही पक्षांची सहमती झाली आहे, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं ही जनतेची इच्छा आहे, असंही ते म्हणाले.

09:32 (IST)22 Nov 2019
मातोश्रीबाहेर पोलिसांचा बंदोबस्त

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 
फोटो सौजन्य : प्रदीप दास

फोटो सौजन्य : प्रदीप दास

09:09 (IST)22 Nov 2019
...तर महाराष्ट्राला मिळू शकते पहिली महिला मुख्यमंत्री

मुख्यमंत्रीपदासंदर्भातील गूढ अद्याप कायम आहे. एकीकडे मुख्यमंत्रीपद हे पाच वर्षांसाठी शिवसेनेलाच देण्यात येण्याच्या चर्चा आहे तर दुसरीकडे अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न सुरु असल्याचे समजते. मात्र असे झाल्यास राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

08:36 (IST)22 Nov 2019
धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी घटकपक्षांची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटकपक्षांची बैठक होणार आहे. सत्तास्थापनेपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस घटकपक्षांशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

08:35 (IST)22 Nov 2019
काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक

राज्यात सत्तास्थापनेनं जोर धरला असून काँग्रेसच्या नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. यामध्ये काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे. 

08:33 (IST)22 Nov 2019
पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री?

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीनं सत्तास्थापनेसाठी वेग धरला आहे. आज महाविकासआघाडीच्यावर अधिकृत घोषणा होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.