राज्यात प्रचाराचा धुरळा उडत असताना शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्राचे सरकार निष्क्रिय असल्याची टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली होती. राहुल गांधीच्या याच विधानाचा संदर्भ देत शिवसेनेनं सवाल उपस्थित करत खडे बोल सुनावले आहे. “मधल्या काळात राहुल बँकॉक-पटाया भागात गेले व तेथे अदृश्य झाले. बँकॉक ही जागा काही प्रतिष्ठत राजकीय नेत्यांनी जाऊन आराम करण्याची नाही. त्यामुळे गांधी बँकॉकला नक्की कशासाठी गेले? यावर संपूर्ण देशातले वातावरण ढवळून निघाले. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी महाराष्ट्रात प्रचारसभा घेतल्या. या सभांमध्ये राहुल यांनी राज्यातील युतीचे सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप केला होता. आरोपावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून राहुल गांधी यांना उलट सवाल केला आहे. “लोकसभा निवडणूक निकालाच्या धक्क्यातून राहुल गांधी सावरले नाहीत व त्यांनी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून काँग्रेस हा बिन मुंडक्याचा पक्ष म्हणून वावरत आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व सोडून राहुल गांधी बँकॉक, युरोप वाऱ्या करतात व दुसऱ्यांना निक्रिय म्हणतात. काँग्रेसला गेल्या चार महिन्यांत अध्यक्ष निवडता आला नाही याचे कारण आधी सांगा. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस महाराष्ट्रात इतका निक्रिय ठरला की, विरोधी पक्ष नेताच फौजफाटय़ासह भाजपात विलीन झाला. वरचे नेतृत्व निक्रिय असल्याचा हा परिणाम आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“बेरोजगारी, पीएमसी बँक घोटाळा यावर मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा काहीच बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी करतात. भाजप व इतर नेते महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी इतर मुद्दे पुढे करून दिशाभूल करतात असे गांधी म्हणत असतील तर ते विरोधी पक्षांच्या निक्रियतेचे पाप आहे. महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कोणते? मुळात या सर्व मुद्द्यांशी सध्या राहुल गांधींचा संबंध राहिला आहे काय? म्हणजे विरोधी पक्षांच्या बोंबलण्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. एक वेळ राज्यकर्त्यांवरचा विश्वास उडाला तर चालेल, पण लोकशाहीत विरोधी पक्षावरचा विश्वास उडता कामा नये ही भावना आहे. ज्या मुद्द्यांना मुख्यमंत्री फडणवीस वगैरे मंडळी प्रचारात हात लावीत नाहीत त्या मुद्द्यांना उचलू नये अशी बंधने कोणी विरोधी पक्षांवर घातलेली नाहीत, पण काँग्रेस पक्षाचा सेनापतीच युद्धभूमीवरून पळ काढतो व बँकॉकला जाऊन बसतो. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ता रणात आणि मनात अशा दोन्ही ठिकाणी पराभूत होताना दिसत आहे. महाराष्ट्रात युतीचे सरकार निक्रिय आहे असे गांधी म्हणतात. मग आपण स्वतः किती क्रियाशील आहात याचाही हिशेब द्या. मेलेल्या विरोधकांनी स्वतःच्या राजकीय व नपुंसकतेवर आधी बोलावे. सरकार निक्रिय ठरले असेल तर त्याचा निर्णय जनताजनार्दन घेईल,”असं सांगत शिवसेनेनं राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.