28 September 2020

News Flash

महाराष्ट्रातील मस्तवाल हैदोस थांबला; शिवसेनेचा भाजपावर निशाणा

सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या.

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन झालं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं नवं सरकार स्थापन झालं. परंतु तीनच दिवसांमध्ये हे सरकार कोसळलं. प्रथम अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील हे आता निश्चित झालं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला आहे. बहुमत चाचणीला सामोरे न जाताच फडणवीस सरकार पळून गेलं. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याही सरकारची आणि राजकीय पक्षाची झाली नव्हती. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस संपला असून आता सर्व शुभ घडेल असं म्हणत भाजपावर निशाणा साधला.

सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचे औटघटकेचे राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरे न जाताच कोसळले. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला त्या अजित पवार यांनी सगळय़ात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गाने महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेले सरकार फक्त ७२ तासांत गेले, असं म्हणत शिवसेनेने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. राजीनामा सत्रानंतर शिवसेनेने सामनामधून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. बहुमताचा आकडा नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा गुन्हा असून ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा, असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. सभागृहाबाहेर बहुमताने केलेला हा पराभव असल्याची टीकाही शिवसेनेनं केली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
सभागृहाबाहेर हा बहुमताने केलेला पराभव होता. आम्ही आमदार फोडू व बहुमत दाखवू या विकृतीसही सर्वोच्च न्यायालयाने वेसण घातली. बहुमत चाचणी गुप्त मतदानाने नको, तर त्याचे लाइव्ह प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ‘ई.डी., इन्कम टॅक्स’ वगैरे भाजपचे कार्यकर्ते काय करणार? संविधान दिवसाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल यावा आणि थैलीशाहीचे आणि दमनशाहीचे राजकारण करू पाहणाऱ्यांना दणका बसावा हादेखील एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल. सत्ताधाऱ्यांनी जरी लोकशाही मूल्यांचा आणि तत्त्वांचा बाजार मांडला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो उधळला गेला. पैशांच्या बॅगा घेऊन एजंट आमदारांच्या पाठी फिरत होते. बहुमत विकत घेऊन राज्य करण्याचा हा प्रयत्न केविलवाणा ठरला. लोकशाही मूल्यांचे रक्षण झाले पाहिजे. लोकांना चांगले सरकार मिळविण्याचा अधिकार आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले. त्या मताचा शेवटी नाइलाजाने का होईना आदर करावा लागला. भारतीय जनता पक्षाशी आमचे वैयक्तिक भांडण असण्याचे कारण नाही. पण जाता जाता फडणवीसांनी आमच्यावर दोषारोप केले आहेत. शिवसेना सत्तेची लाचार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. हे सांगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील.

शिवसेनेला सत्तेची लाचार म्हणणाऱयांनी स्वतःच्या अंतरंगातील जळमटे आधी पाहावीत. अजित पवारांशी त्यांनी ‘पाट’ लावलेला चालतो, पण शिवसेनेस जे द्यायचे ठरले होते त्यावर पलटी मारून काय मिळवले? सत्तेची लाचारी नसती व दिलेल्या शब्दास जागण्याची इच्छा असती तर ही वेळ भाजपवर आली नसती. तुम्ही खोटे बोललात व शिवसेनेला खोटे पाडण्याचा प्रयत्न केलात. त्यामुळे महाराष्ट्राचे स्थैर्य व स्वाभिमान यासाठी आम्ही तीन पक्षांनी एकत्र यायचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे २०१४ साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपाने घेतला होता तेव्हा ती लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपाचे वैफल्य असे आहे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आले नाही. महाराष्ट्राने दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने पाणी दाखवले. महाराष्ट्रात भाजपने सत्तेसाठी इतके अगतिक का व्हावे? इतके अनैतिक व तत्त्वशून्य वागण्याची वेळ त्यांच्यावर यावी हे दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी यांच्या आजच्या वारसदारांचे दुर्दैव! अजित पवार यांनी शेवटच्या टप्प्यात आपले वस्त्रहरण थांबवले, पण भाजपा पुरती नागडी झाली. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 7:45 am

Web Title: shiv sena criticize former cm devendra fadnavis over government formation maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 पादचारी मार्गिकेचा प्रयोग फसला?
2 विद्यार्थ्यांचे प्रबंध वाळवीच्या मुखी
3 दादरमध्ये पालिका मंडईबाहेर तांदळाच्या भुशाचा ढीग
Just Now!
X