कल्याणच्या शिवसेना जिल्हाप्रमुखांचा विरोध; उल्हासनगरमधील शिवसैनिकांचे भाजपला समर्थन

“पुन्हा सत्तेवर आल्यानंतर उल्हासनगरमध्ये मेट्रो प्रकल्प आणला जाईल आणि मेट्रो स्थानकाला सिंधूनगर असे नाव देऊ,” अशी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगर मतदारसंघातील सिंधी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपाची ही घोषणा शिवसेनेत दुफळी माजवण्यास कारणीभूत ठरली आहे. कारण कल्याणमधील शिवसैनिकांचा याला विरोध होत असून, उल्हासनगरमधून मात्र, समर्थन केले जात आहे. त्यामुळे ऐन प्रचारात शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

सिंधूनगरासंबंधी भाजपने भूमिका स्पष्ट करावी अन्यथा युतीचे काम थांबवू, असा इशारा शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिला. त्याच वेळी उल्हासनगर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी मात्र आम्ही कुमार आयलानी यांचेच काम करणार, असा पवित्रा घेतला आहे. या दोन वेगवेगळ्या भूमिकांमुळे शिवसेनेत पुन्हा एकदा सावळा गोंधळ निर्माण झाला आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उल्हासनगरात प्रचारसभा घेत त्यात उल्हासनगराच्या नामकरणाला हात घातला. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने असे नामकरण करण्यास विरोध केला आहे. त्यासाठी शिवसेनेने अनेक आंदोलनेही केली आहेत. असे असताना मुख्यमंत्र्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केल्यामुळे शिवसेना खासदार, आमदारांचे चेहरे पाहाण्यासारखे झाले होते. समाजमाध्यमांवर प्रथम मनसे आणि नंतर शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उघडपणे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत होते. त्यात रविवारी एका खासगी मुलाखतीत बोलताना शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी भाजपचे उमेदवार कुमार आयलानी स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत भाजपचे काम थांबवणार, असे सांगितले. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता होती. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये तणावाचे चित्र होते. त्यामुळे भाजपचा प्रचार करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. याबाबत लांडगे यांना संपर्क केला असता त्यांनी सिंधूनगरचा विषय काढताच त्यांनी दूरध्वनी बंद केला. त्यानंतर उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारले असता, मेट्रो स्थानकाला सिंधूनगर नाव देण्यास खूप वेळ आहे. शहरात मेट्रोची अनेक स्थानके तयार होतील आणि त्याच वेळी त्याबाबत निर्णय घेऊ. शिवसेनेचा विरोधाचा हक्क अबाधित आहे. त्यावर आता बोलता येणार नाही, मात्र सध्या कुमार आयलानींचा प्रचार महत्त्वाचा असून शिवसेना कुमार आयलानी यांचा प्रचार करणार. तसेच त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सिंधूनगरच्या मुद्दय़ावर शिवसेनेतच दोन गट पडले असून संभ्रमाचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.