महाराष्ट्रात शिवसेना आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार बनवायला तयार आहे. सत्तेसाठी या दोन पक्षांबरोबर आघाडी करण्याचा शिवसेनेचा निर्णय अनेकांना खटकू शकतो. कारण शिवसेना हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादी धर्मनिरपेक्षतेचा विचार मानतात. पण शिवसेनेच्या इतिहासावर नजर टाकली तर एक गोष्ट लक्षात येईल. शिवसेनेने पूर्णपणे वैचारीक मतभेद असलेल्या पक्षांबरोबही जुळवून घेतले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

२००७ आणि २०१२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस प्रणीत संपुआ उमेदवाराला मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवार दिला नाही. तसंच कधीकाळी मुस्लिम लीग पक्षाबरोबरही युती केली होती. त्यामुळे हिंदुत्वाचा पुरस्कार करताना शिवसेनेने राजकीय विरोधकांबरोबरही जुळवून घेतल्याचा इतिहास आहे.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ साली शिवसेनेची स्थापना केली. तेव्हापासून शिवसेनेने कधी जाहीरपणे तर कधी पडद्यामागून काँग्रेसला साथ दिली होती. १९६०-७० च्या दशकात मुंबईत डावे आणि त्यांच्या कामगार संघटनांचा प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचा वापर केला असे ठाकरे विरुद्ध ठाकरे पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी यांनी म्हटले आहे. शिवसेनेने आणीबाणीच्या निर्णयाला पाठिंबा दिला होता. १९७७ साली शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुरली देवरा यांना पाठिंबा दिला होता असे कुलकर्णी यांनी सांगितले.

त्यावेळी शिवसेनेला वसंतसेनाही म्हटले जायचे. १९६३ ते १९७४ या काळात वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९७८ साली जेव्हा जनता पार्टी बरोबर आघाडीचा प्रयत्न फसला. त्यावेळी शिवसेनेने इंदिरा गांधींच्या काँग्रेस आय बरोबर आघाडी केली असे राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी आपल्या लेखात म्हटले आहे. शिवसेनेने मुस्लिम आघाडीबरोबरही युती केली होती. १९७० साली मुंबई महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेने मुस्लिम लीगबरोबरही आघाडी केली होती असे ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी शिवसेनेवरील ‘जय महाराष्ट्र’ पुस्तकात लिहीले आहे. शिवसेनाप्रमुखांनी त्यावेळी नागपाडयामध्ये मुस्लिम नेत्यांसोबत एकाच मंचावरुन सभाही संबोधित केली होती.

मुंबईतील डाव्यांचा प्रभाव संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेचा वापर केला असेल तर १९६८ साली मधु दंडवतेंच्या प्रजा सोशलिस्ट पार्टीबरोबरही शिवसेनेने आघाडी केली होती. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध तितके मधुर राहिले नाहीत. राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या काळात शिवसेना आणि काँग्रेसचे संबंध बिघडत गेले.