राज्यातील निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. असं असलं तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेत समसमान वाट्यावर शिवसेना ठाम आहे. अशातच सत्तास्थापनेचा तिढा अजून वाढत चालला आहे. दरम्यान, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. परंतु भाजपा ही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे का हे त्यांनाच विचारलं पाहिजे, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला. तसंच साम, दाम, दंड, भेद हा सत्तेचा माज आलेलेच वापरतात असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला हाणला.

शिवसेना आपल्या भूमिकेवर पहिल्या दिवसापासून ठाम आहे. आम्ही आमची भूमिका बदललेली नाही. या निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. परंतु भाजपा अद्यापही सत्तास्थापनेचा दावा का करत नाही हे समजत नसल्याचं राऊत म्हणाले. धमक्या आणि ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही. राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, असंही त्यांनी नमूद केलं. २०१४ मध्ये राज्यात अल्पमतातलं सरकार आणण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये जमिन आसमानाचा फरक असल्याचं ते म्हणाले.

भाजपा दावा करत असली तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळेच ते सत्ता स्थापन करत नसल्याचे राऊत यांनी सांगितलं. आपल्याकडे बहुमत नसेल तर त्यांनी लोकांसमोर येऊन सांगावं. जनतेला वेठीस धरण्याचं काम त्यांनी करू नये. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं पाप होत, असल्याचा आरोपही राऊत यांनी केला.