शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला हिंदुत्व आणि स्वाभिमानाची आठवण करून दिली होती. स्वाभिमान आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” अशी टीका राऊत यांनी केली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन असून, आदरांजली वाहण्यासाठी राजकीय नेत्यांसह शिवसैनिकांनी शिवाजी पार्कवरील शिवतीर्थावर गर्दी केली आहे. शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी बाळासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी फडणवीस यांना उत्तर दिलं. राऊत म्हणाले, “बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना वचन दिलं आहे. ते पूर्ण होणार आहे. बाळासाहेबांसाठी काहीही करू. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेला कुणीही शहाणपणा शिकवण्याची गरज नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला. “शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार आहे आणि तो शिवतीर्थावर येईल,” असं सांगत संजय राऊत यांनी लवकरच सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत दिले.

काय म्हणाले होत फडणवीस?

“हिंदूह्रदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन करतो. स्वर्गीय बाळासाहेब हे आमच्या सर्वांसाठी स्फुर्तीदायक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्राचं सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वैभव म्हणून ज्यांच्याकडं बघता येईल, असे बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब हे उर्जेचा स्त्रोत होते. छोट्यातील छोट्या माणसाला बाळासाहेबांच्या विचारानं ऊर्जा मिळायची. आपल्या एका वाक्यानं प्रेरित करण्याची क्षमता आणि किमया आदरणीय बाळासाहेबांमध्ये होती,” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर  “जोपर्यंत तुमचा स्वाभिमान जिवंत राहिल, तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. नाहीतर रसातळाला चाललंय. नावाला जपा. नाव मोठं करा. एकदा का नाव गेलं की, परत येत नाही. हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत आणि सातत्यानं आसमानात फडकत राहिला पाहिजे,” असं आवाहन करणारा बाळासाहेबांचा भाषणातील संपादीत भाग या व्हिडीओत समाविष्ट करण्यात आलेला आहे.