काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आमची चर्चा झाली आहे. लवकरच आमचं सरकार येणार असल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट झाली. त्या भेटीनंतर राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आज संध्याकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडणार आहे. त्या बैठकीनंतर पुन्हा एकदाशरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. यावेळी १०० टक्के शिवसेनेचंच सरकार येईल. पुढच्या आठवड्यात शिवसेनेचं सरकार स्थापन होणार आहे. संध्याकाळी ४.३० वाजता काँग्रेसच्या हंगामी अधक्षा सोनिया गाधी या प्रदेश नेत्यांना भेटणार आहेत. तर साडेपाच वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली.

आणखी वाचा- “बंद करा युतीया बनवायचा धंदा”; मनसेचा शिवसेना-भाजपाला टोला

सकाळी पार पडलेल्या पत्रकार परिषदेतही राऊत यांनी उद्यापर्यंत सरकार स्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच डिसेंबर महिना उजाडण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं होतं. सरकार स्थापनेतील सर्व विघ्न दूर झाली आहेत. राज्यातील राष्ट्रपती शासन दूर करण्यासाठी काही कायदेशीप बाबींमधून जावं लागतं. तसंच राज्यपालांना बहुमताचा आकडा पुरव्यांनीशी द्यावा लागतो. ती प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल आणि डिसेंबर महिना उजाडेपर्यंत सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले होते.

राष्ट्रपती शासनादरम्यान कोणीही सरकार स्थापन करण्याचा दावा केल्यास ते सरकार स्थापन करू शकतात. ज्या लोकांना वाटतं राज्यात लोकप्रिय सरकार येऊ नये, प्रदीर्घ काळ राष्ट्रपती शासन रहावं, शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये, असे लोक निरनिराळ्या बातम्या पेरत असतात, असं सांगत शिवसेनेत कोणताही संभ्रम नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.