“शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते,” अस शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले होते. त्यावर “युतीबद्दल बोलण्याचे अधिकार तीन व्यक्तीनांच आहे. त्यांच्याशिवाय कुणालाही अधिकार नाही,” असे सांगत भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रावते यांना टोला लगावला होता. दरम्यान, रावते यांची शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पाठराखण केली आहे. “५०-५० फॉर्म्युला अमित शाह यांच्यासमोर ठरला आहे. त्यामुळे रावते काहीही चुकीचं बोललेले नाही,” अस संजय राऊत म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना युती होणार की नाही याबद्दल संभ्रमाचे वातावरण आहे. युतीवरून दोन्ही पक्षातील नेते वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत. “शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाही तर युती तुटू शकते,” असं शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले होते. रावते यांच्या भूमिकेनंतर युतीचं काय? हा प्रश्न चर्चेत आला.

रावते यांच्या भूमिकेनंतर भाजपाचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी युतीविषयी भूमिका मांडली.  “युतीच्या जागावाटपाचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबद्दल बोलण्याचा अधिकार फक्त तीन लोकांनाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तीन व्यक्तीनांच युतीबद्दल बोलण्याचा अधिकार आहे. युती होणार आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत जागावाटपाचा तिढा सुटेल,”असं महाजन म्हणालेे होते.

दरम्यान, महाजन यांच्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी युतीच्या जागावाटपाबाबत खुलासा करत रावते यांची पाठराखण केली आहे. “५०-५० हे युतीच्या जागावाटपाचे सूत्र भाजपाध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ठरला आहे. त्यामुळे रावते काहीही चुकीचं बोललेले नाहीत. शिवसेना-भाजपा सोबत निवडणूक लढवणार आहे,” असं राऊत म्हणाले.