27 September 2020

News Flash

मराठवाडय़ात शिवसेनेचा आलेख घसरणीचा!

 १९९०च्या निवडणुकीत मराठवाडय़ात शिवसेनेने पाय पसरायला सुरुवात केली.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

सुहास सरदेशमुख

गळ्यात दिवसभर भगवा गमछा घालणारा शिवसैनिक आता तसा दिसत नाही. पण ज्या मतदारसंघात ‘खान की बाण’ असा प्रचाराचा केंद्रबिंदू असतो, तेथे भाळी अष्टगंध लावणारा कार्यकर्ता जेव्हा ‘आवाज कोणाचा’ अशी घोषणा येते तेव्हा प्रतिसाद देतो तो कार्यकर्ता शिवसेनेचा. मराठवाडय़ात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची ही ओळख काही ठरावीक मतदारसंघांमध्ये अधोरेखित होणारी असली तरी काही मतदारसंघ शिवसेनेसाठी राजकीयदृष्टय़ा अक्षरश: शुष्क म्हणता येतील असे आहेत. त्यात लातूर आणि बीड जिल्ह्य़ातील मतदारसंघांचा समावेश करावा लागेल. गेल्या सहा विधानसभा निवडणुकांमध्ये मराठवाडय़ात सेनेचा आलेख घसरणीला लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गमछा घालून आक्रमक होणारा शिवसैनिक आता अष्टगंधावर आला आहे.

१९९०च्या निवडणुकीत मराठवाडय़ात शिवसेनेने पाय पसरायला सुरुवात केली.  तेव्हा नऊ जागांवर सेनेचे आमदार निवडून आले होते.  एका गावातील सेनेच्या शाखेचा फलक काढला म्हणून प्रा. सुरेश नवले काँग्रेसच्या एका नेत्याच्या तोंडावर थुंकले होते. पराकोटीचा हा विरोध नंतर चुकीचा होता, हे त्यांनाही कळत गेले. पण अशा तरुण माणसांना एकत्र करण्याचे कसब शिवसेनाप्रमुखांकडे होते. अंगात रग असणारा सामान्य माणूस निवडणुकीत उभा करायचा आणि प्रस्थापितांना धक्का द्यायचा, अशी रणनीती होती. हळू हळू सेनेतली मंडळी प्रस्थापित होत गेली आणि विरोध करण्याची जिगरही कमी होत गेली. परिणामी २००९ मध्ये आघाडीचे सरकार आले तेव्हा मराठवाडय़ातील सेना आमदारांची संख्या होती फक्त सहा आणि सध्या सेनेच्या आमदारांची संख्या आहे ११. जयप्रकाश मुंदडा, अर्जुन खोतकर या नेत्यांनी यश-अपयश बघितले. सध्या त्या पिढीतील चंद्रकांत खैरे यांच्या वाटय़ाला अपयश आलेले आहे.

मतविभाजन पथ्यावर

औरंगाबाद पश्चिममधून १९९० साली चंद्रकांत खैरे निवडून आले होते तेव्हा या मतदारसंघातील एकूण उमेदवारांची संख्या ४३ होती.  जेथे उमेदवार अधिक तेथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येत असे. १९९० मध्ये जालना मतदारसंघात अर्जुन खोतकर निवडून आले तेव्हा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या ३० होती. वसमतसारख्या छोटय़ा मतदारसंघातदेखील त्या काळी १५ उमेदवार रिंगणात होते. आघाडीच्या मताचे विभाजन आणि हिंदू मतांच्या एकत्रीकरणाचा प्रयत्न पुढे होत राहिला आणि सेनेला १९९५च्या विधानसभा निवडणुकीत मराठवाडय़ात १४ मतदारसंघांत आमदार निवडून आणता आले. यात उस्मानाबाद, परभणी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्य़ांतील मतदारसंघांचा समावेश होता. सेना रुजली नाही ती बीडमध्ये आणि लातूरमध्ये.

सेनेची मराठवाडय़ातील ताकद तशी कमीच होत गेली. आठ जिल्हा परिषदांमध्ये सेनेचे सध्या ८६ जि. प. सदस्य आहेत. हा पक्ष चौथ्या क्रमांकावर आहे. भाजपचे १३२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ११९ आणि काँग्रेसचे ९८ सदस्य आहेत. ग्रामीण भागातील सेनेचे पाठबळ वाढल्याचा दावा करत शेतीचे प्रश्न शिवसेना हाती घेत आहे, असे चित्र जरी निर्माण केले जात असले तरी सहकार आणि ग्रामीण अर्थकारणाच्या उपक्रमांमध्ये सेना क्वचितच दिसते. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये होताना दिसतो आहे. भाजपकडून युतीमध्ये जागा भांडून घेण्यासाठी ताकद वाढली असल्याचा सेनेचा दावा असला तरी तो मराठवाडय़ात तसा लागू होताना दिसत नाही. भाजपवर कुरघोडी करायची म्हणून औरंगाबादसारख्या ठिकाणी शिवसेनेने जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी काँग्रेसबरोबरही हातमिळवणी केली होती.

भाषा बदलली

  • शिवसेनेच्या वाढीला आक्रमक भाषेचा बाज आहे. १९९५ मध्ये शिवसेनेच्या मराठवाडय़ात सर्वाधिक १४ जागा निवडून आल्या होत्या तेव्हाची भाषा आता शिल्लक राहिली नाही.
  • घसरणीला लागलेल्या सेनेला पुन्हा वाढायचे असेल तर नव्या विषयांवर आणि मराठवाडय़ाच्या प्रश्नांवर काम करावे लागणार आहे. केवळ आपला मतदारसंघ बांधण्यापर्यंत सेनानेते सध्या काम करताना दिसत आहेत.
  • सेनेचा राजकारणाचा आढावा घेताना पत्रकार जयदेव डोळे म्हणाले, ‘सेनेच्या राजकारणाचा पोत पाहिला तर मराठवाडय़ातले प्रश्न कधी समजून घेतले आहे, असे वाटत नाही. राजकीय वाढ करून घेण्यासाठी सेनेची कधी शिबिरे झाली नाहीत. मराठवाडय़ात विविध विषयांचे अभ्यासक असतानाही सेनानेत्यांची त्यांच्याशी कधी जवळीक आहे, असेदेखील दिसले नाही. त्यामुळे घटना-घडामोडींवरील प्रतिक्रिया देणारा कार्यकर्ता अशीच सेनेची प्रतिमा राहिली.’

बाळासाहेबांचा करिष्मा होता. संघटनेत आक्रमकता होती. अलीकडे संपर्कप्रमुखांकडून मातोश्रीपर्यंत अचूक माहिती जात नाही. त्यामुळे ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होताना दिसते. ३४ वर्षे शिवसेनेत काम करतो आहे. पक्षासाठी लढलो. पण संघटनात्मक मतभेद संपविण्याऐवजी ते वाढविण्याकडेच संपर्कप्रमुखांचा कल असल्याचे दिसून आले आहे.

-शिवाजी चोथे, माजी आमदार शिवसेना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2019 1:12 am

Web Title: shiv sena marathwada assembly election abn 97
Next Stories
1 लाचेच्या गुन्ह्यातील सुनावणीच्या दिवशीच पोलिसाची आत्महत्या 
2 पोलीस नाईकची आत्महत्या
3 “गुजरातमध्ये बस स्टँडही नाहीत, तेवढी विमानतळे पवारांनी महाराष्ट्रात उभारली”
Just Now!
X