“महाराष्ट्र सध्या विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रस्थानी आहे. तरीही पायाभूत सुविधा आणि ओला दुष्काळ यावर अधिक काम करावं लागणार आहे. तुम्ही पुढील पाच वर्ष काय घेऊन बसलात. पुढची २५ वर्ष राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल. आम्ही सारख मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,” असं म्हणणार नाही. तसंच ये-जादेखील करणार नाही. कायम सत्तेत राहू,” असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला.

आणखी वाचा- पुढची २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल : संजय राऊत

“आम्हाला ओला दुष्काळ, पायाभूत सुविधा अशा बाबींवर अजून काम करावं लागणार आहे. आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत ते अनेक वर्ष सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा मोठा अनुभव आहे. राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पुढील सरकार हे शिवसेनेच्या नेतृत्वातच येणार आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरीही ते बदलता येणार नाही,” असं राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

आणखी वाचा- राज्यात भाजपाशिवाय कोणाचेही सरकार येणार नाही : देवेंद्र फडणवीस

“राज्याच्या विकासात यशवंतराव चव्हाण यांचं मोलाचं योगदान होतं. तसंच काँग्रेसच्याही अनेक नेत्यांचं मोठं योगदान आहे. महाराष्ट्राला आम्हाला पुढे न्यायचं आहे. राज्यात आतापर्यंत अनेक पक्षांचं सरकार होतं. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकसूत्री कार्यक्रम ठरवला आहे. सत्तेचा फॉर्म्युला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेच ठरवतील,” असंही त्यांनी नमूद केलं. “यापूर्वी भिन्न विचारधारांचे लोक एकत्र येऊन सरकार स्थापन केलं होते. त्यानंतरही राज्याचा कारभार सुरळीत सुरू होता. गेले अनेक वर्ष उद्धव ठाकरे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत. काही पक्ष एकत्र येऊन जर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असतील तर त्यात त्यांचच भलं आहे,” असंही ते म्हणाले.