राज्यात १ डिसेंबरपूर्वी सरकार स्थापन होईल. काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पार पडलेली बैठक ही सकारात्मक झाली, असल्याची माहिती शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली. यावेळी त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चा सुरू असल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी ही माहिती केवळ तुमच्याकडे असून माझ्याकडे याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं.

“मुख्यमंत्रिपदाच्या वाटपाबद्दल अद्याप काहीही ठरलेलं नाही. तसंच आघाडीत पक्षांनी तशी कोणती मागणीही केली नाही. याबाबत विनाकारण गोंधळ उडवू नये. जो काही निर्णय होईल, ते सर्वांच्या समोर येईल,” असं राऊत यावेळी म्हणाले. “दिल्लीतील काम आता संपलं आहे. पुढील सर्व चर्चा या मुंबईतच होतील. तिन्ही पक्षांची संयुक्त बैठकही मुंबईतच होईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्रही सुरू आहे. त्यातच बुधवारीही दिवसभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचा सपाटा सुरू होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आणखी काही काळ चर्चा सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. दरम्यान, या बैठकांमध्ये अनेक गोष्टींवर एकमत झालं आहे. तर पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती.

देशाची घटना सेक्युलर संकल्पनेवर आधारित
“आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे. कोणालाही मदत करताना जात धर्म पंथ पाहून मदत केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील सर्व धर्मियांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केलं होतं. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेबर हे देशातील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी न्यायालयात कुराण, भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितलं होतं,” असंही ते म्हणाले.