खासदार विनायक राऊ त यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : शिवसेना —भाजपा युती भक्कम आहे. पण आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जहरी टीका करणाऱ्या खासदार नारायण राणेंच्या प्रवृत्तीविरुद्ध कणकवलीत आम्ही लढत देत आहोत, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सोमवारी दिले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती झाली असली तरी कणकवली मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेने सतीश सावंत यांना दिलेली उमेदवारी भाजपाच्या दबावानंतरही सोमवारी मागे घेण्यात आली नाही.

या आग्रही भूमिकेबाबत सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत खासदार राऊत म्हणाले की, राणे हा विषय जिल्ह्यातून पूर्ण संपवायचा आहे, म्हणूनच शिवसेनेने कणकवलीत सावंत यांना उमेदवारी दिली आहे.  आम्ही भाजपच्या विरोधात राजकारण करत नसून एका अपप्रवृत्तीच्या विरोधात ही लढाई आहे आणि या प्रवृत्तीविरुद्ध शिवसेना—भाजप—रिपाइं महायुतीचे उमेदवार म्हणून सावंत रिंगणात आहेत. राणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. अशा विकृतीला आम्ही जवळ कसे करणार ? केवळ आपल्या मुलाचा तारू किनाऱ्याला लागण्यासाठी राणेंचा खटाटोप  सुरू असून कणकवलीत शिवसेनेचा उमेदवार देऊन आम्ही कुठल्याही प्रकारे भाजपचा अवमान केलेला नाही, असेही मत राऊ त यांनी व्यक्त केले.

गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतील शिवसेना—भाजप युतीमध्ये राणे यांचा स्वाभिमान पक्ष हा घटक पक्ष असतानाही त्यांनी आपल्या मुलाला रत्नागिरी—सिंधुदुर्ग मतदारसंघातून त्या निवडणुकीत उतरवत युतीशी बेइमानी केली होती. सुदैवाने जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. अशा परिस्थितीत आज कोणत्या आधारावर ते युती धर्म तोडला, म्हणून आम्हाला दोष देत आहेत? असा सवाल करून राऊत म्हणाले की, कणकवलीत राणे सोडून कोणालाही भाजपाने उमेदवारी दिली तर त्यांना विजयी करण्यासाठी शिवसैनिक जीवाचे रान करतील, असे भाजपच्या नेत्यांच्या कानावर घातले होते. पण भाजपाने तसे केले नाही. मात्र भाजपाचे स्थानिक युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, सदा ओगले, संदेश पटेल इत्यादींनी सतीश सावंत यांना पाठिंबा दिला आहे, असाही दावा खासदार राऊ त यांनी केला .

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा १६ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करण्यात आल्या असून त्याबाबतचा तपशील नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

भाजपाचा निष्ठावंतांवर अन्याय – संदेश पारकर

राणेंच्या दहशती प्रवृत्तीमुळे त्यांना चार वेळा जनतेने नाकारले आहे. असले पार्सल भाजपात घेऊ नका,  असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता.मात्र भाजपाने निष्ठावंतांवर अन्याय करून राणेंना प्रवेश दिला आणि कणकवलीतून उमेदवारीही दिली. राणेंचा प्रवेश भाजपाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही. ज्या राणे प्रवृत्तीशी लढलो,त्या राणेंसोबत काम कसे करायचे? ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांंमध्ये आहेम्. त्यामुळे मतविभाजन टाळून राणेंना रोखण्यासाठी  मी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे, अशी भूूमिका  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपाचे युवा नेते संदेश पारकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषदेत मांडली.

यावेळी भाजपाचे बंडखोर नेते अतुल रावराणे, संदेश पटेल, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, कन्हैया पारकर, रूपेश नार्वेकर, अवधुत मालणकर, प्रितम मोर्ये, भाई पारकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.