राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. तर दुसरीकडे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. यासाठी सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्रही सुरू आहे. त्यातच बुधवारीही दिवसभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचा सपाटा सुरू होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं आणखी काही काळ चर्चा सुरू राहणार असल्याचंही स्पष्ट केला. दरम्यान, या बैठकांमध्ये अनेक गोष्टींवर एकमत झालं आहे. तर पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा तर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल अशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसंच त्यानंतर पुन्हा त्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेत सोनिया गांधी यांचा निरोप त्यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, तिन्ही पक्षांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमावरही सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच तिन्ही पक्षांचे नेचे राज्यातील सरकार स्थापनेसाठी पाठिंब्याची पत्र घेऊन शुक्रवारी किंना शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

राज्यातील सत्तापेच सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाल्याचा उल्लेख माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. तर दुसरीकडे शिवसेनेशी हातमिळवणी करणार का, या मुद्दय़ावर काँग्रेसने अजून तरी मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेचे पर्यायी सरकार लवकरच स्थापन होईल, असा दावा पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीपूर्वी काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेनेशी हातमिळवणी, सरकारमधील सहभाग आदी विषयांवर चर्चा झाली. पवारांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला अहमद पटेल, वेणुगोपाळ, जयराम रमेश आणि मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे केंद्रीय नेते उपस्थित होते. एकूणच राजधानी दिल्लीत दिवसभर चर्चांचा सपाटा सुरू होता.