मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना घटक पक्षांना भाजपनेच जागा द्याव्यात हा आग्रह सोडण्यास शिवसेना तयार झाली असून काही जागा मित्र पक्षांसाठी सोडण्याची तयारी दाखवल्याचे समजते. शिवसेनेला १२५ ते १२६ जागा सोडण्याबाबत सहमती झाली असून त्यातूनच शिवसेनेला मित्र पक्षांसाठी जागा सोडाव्यात असा भाजपचा आग्रह होता. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेर सेना त्यास तयार झाली आहे.

युतीची चर्चा अद्याप सुरू असली तरी रखडण्यामागे केवळ भाजप-शिवसेनेतील मतभेद नव्हे तर आयत्यावेळी घोषणा करून आणि अंतिम टप्प्यात काही जागांवरील उमेदवारांची घोषणा करून बंडखोरांना वाव मिळू नये यासाठीच ते सुरू असल्याचे समजते. निम्म्या जागांचा आग्रह शिवसेनेने मागच्याच आठवडय़ात सोडला. त्यावेळी किमान १२६ जागा हव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तर या १२६ जागांमध्ये मित्र पक्षांनाही जागा सोडाव्यात असे भाजपचे म्हणणे होते. त्यावर सध्याच्या महायुतीमधील सर्व घटक पक्ष हे भाजपचे मित्र पक्ष असल्याने केवळ भाजपनेच जागा सोडाव्यात असे सेनेचे म्हणणे होते.

पण युती सरकारचे आणि आता निवडणुकांना सामोरे जाताना युतीचे ते घटक पक्ष असल्याने भाजपबरोबरच शिवसेनेलाही त्यांचा लाभ होणार असल्याने शिवसेनेनेही मित्र पक्षांना जागा द्याव्यात, असा भाजपचा आग्रह होता. अखेर शिवसेना १२५ ते १२६ जागा स्वीकारण्यास तयार झाली असून त्यात काही जागा मित्र पक्षांनाही सोडण्याची तयारी असल्याचे भाजपला कळवण्यात आल्याचे समजते.