25 February 2021

News Flash

भगव्या ध्वजाशी वैर घ्याल तर स्वत:चेच नुकसान कराल : शिवसेना

उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल.

(संग्रहित छायाचित्र)

महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर गुरूवारी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आपल्या नव्या कारकिर्दीला सुरूवात केली. उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतरही शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसत आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल, असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.

महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी जनता दिल्लीशी झुंजली. संघर्ष केला. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही हा बाणा दाखविणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील यात्री खात्री बाळगायला हरकत नाही, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

संपादकीयमधून भाजपावरही टीकेचे बाण सोडण्यात आले आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील, असं म्हणत शिवसेनेनं भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे सत्य व न्यायाच्या सर्व कसोट्यांवर उतरून स्थिरस्थावर होईल. पाच वर्षांत पाच लाख कोटींचे कर्ज राज्यावर लादले व फडणवीस सरकार गेले. त्यामुळे नव्या मुख्यमंत्र्यांनी जे संकल्प योजले आहेत त्यावर वेगाने, पण सावधपणे पावले टाकावी लागतील. पंतप्रधान मोदी यांनी नव्या सरकारला व मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने गतिमान विकास घडवावा, असे आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट केले. त्यासाठी केंद्राची भूमिका सहकार्याची हवी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुःखाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी केंद्रालाच सहकार्याचा हात पुढे करावा लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप-शिवसेनेचे बिनसले आहे, पण नरेंद्र मोदी व उद्धव ठाकरे यांच्यातील नाते भावा-भावाचे आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधान म्हणून साथ देण्याची जबाबदारी  मोदी यांची आहे. पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे असतात, एका पक्षाचे नसतात हे सूत्र ठेवले तर जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांच्या सरकारविषयी मनात राग-लोभ का ठेवायचा? महाराष्ट्राच्या जनतेने घेतलेल्या निर्णयाचा मान दिल्लीने ठेवावा व सरकारच्या स्थैर्याला चूड लागेल असे काही घडू नये याची काळजी घ्यावी.

महाराष्ट्र म्हणजे चालता बोलता पुरुषार्थ! हा पुरुषार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मातीच्या कणाकणात दिसत असतो. शिवरायांनी शून्यातून स्वराज्य जन्माला घातले. परकीय राजवट उलथवून पाडण्यासाठी शिवाजी महाराज कर्दनकाळासारखे झुंजले आणि त्याच वेळी मातेच्या वात्सल्याने व दक्षतेने त्यांनी स्वराज्याचे सुराज्य करण्याची विधायक तपश्चर्या आचरली. स्वराज्यनिर्मितीसाठी शस्त्र व सुराज्याचा साक्षात्कार प्रत्येकास हमखास घडविणारे राज्यकारभाराचे आदर्श शास्त्र यशस्वीरीतीने हाताळणारे छत्रपती शिवाजीराजांसारखे साहसी पुरुष म्हणजे साक्षात परमेश्वरी शक्तीचाच अवतार होय. स्वराज्य स्थापनेच्या आड त्यांनी कळीकाळालाही येऊ दिले नाही. गळ्यातील ताईतही जरासा वाकडा वागला तर त्याची काडीमात्रही गय न करता दुर्गुण त्यांनी जेथल्या तेथे ठेचून काढले. संघर्ष आणि लढे आमच्या पाचवीलाच पुजले आहेत. दिल्ली देशाची राजधानी जरूर आहे, पण महाराष्ट्रही दिल्लीश्वराचा गुलाम नाही हा बाणा दाखविणाऱया बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा बाणा आणि सरकारचा कणा ताठ राहील यात्री खात्री बाळगायला हरकत नाही. महाराष्ट्रास छत्रपती शिवरायांनी जे दिले त्यात स्वाभिमान महत्त्वाचा आहे.

महाराष्ट्र दिल्लीस सर्वाधिक पैसा मिळवून देतो. देशाचे अर्थकारण मुंबईवर चालले आहे. देशाला सर्वाधिक रोजगार मुंबईसारखी शहरे देत आहेत. देशाच्या सीमांवर महाराष्ट्राचे जवान शहीद होत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण हे तर महाराष्ट्राचे पिढीजात कर्तव्यच आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर आता अन्याय होणार नाही व सन्मान राखला जाईल याची काळजी नव्या मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल. दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र चौथ्या-पाचव्या रांगेत उभा राहणार नाहीच, तर अग्रभागी राहून तो कर्तृत्व गाजवील असे परंपरा सांगत आहे. याच परंपरेचा भगवा ध्वज महाराष्ट्राच्या विधानसभेवर, मंत्रालयावर फडकला आहे. भगव्या ध्वजाशी वैर घेऊ नका. वैर घ्याल तर स्वतःचेच नुकसान करून घ्याल. महाराष्ट्रात सुराज्याचा उत्सव सुरू झाला आहे. बघता काय? सामील व्हा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 7:39 am

Web Title: shiv sena saamna editorial on various issues to be faced in maharashtra vidhan sabha election 2019 jud 87
Next Stories
1 आधार संलग्नता नसल्याने ३ लाख शेतक ऱ्यांना लाभ नाही
2 सूर्या नदीवरील पूल अपूर्णावस्थेत
3 तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रस्ता जीवघेणा
Just Now!
X