दयानंद लिपारे

कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणाचा रंग तिरंग्याकडून भगव्याकडे वाटचाल करू लागल्याचे चित्र गेल्या पाच वर्षांत ठळकपणे दिसू लागले आहे. हाच क्रम कायम ठेवत भाजप- शिवसेना महायुतीकडून विधानसभा निवडणुकीत आणखी धवल कामगिरी करण्याची तयारी सुरू आहे. तर, गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. महापुराचे राजकारण भरात येण्याची लक्षणे दिसत असल्याने त्या काळातील कोणाची कामगिरी सरस यावरून निकालाचा कल बदलू शकतो.

भाजप-शिवसेना महायुतीमध्ये समन्वय असला तरी जागावाटप हा कळीचा मुद्दा असणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अद्याप एकोपा नसतानाही जिल्ह्य़ातील १० पैकी ८ जागा जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे. सध्याच्या राजकारणाचे वारे पाहता हे आव्हानात्मक असून उभय काँग्रेसच्याच सुभेदारांचा विधानसभेत प्रवेश सुकर होणार का, हा प्रश्न आहे. अद्याप भूमिका स्पष्ट न केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी या पक्षांच्या भूमिकांमुळे निकालाचे पारडे बदलू शकते.

भिस्त चंद्रकांत पाटील यांच्यावर

लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला राजू शेट्टी आणि धनंजय महाडिक हे दोन मोहरे गमवावे लागले. जिल्ह्य़ातल्या दोन्ही जागांवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याने शिवसेनेच्या अपेक्षांना धुमारे फुटले आहेत. जिल्ह्य़ातील १० पैकी सर्वाधिक सहा आमदार सेनेचे असून अन्य दोन मतदारसंघ त्यांच्याच वाटणीला आहेत. भाजपकडे दोन आमदार आहेत. भाजपच्या वाढत्या शक्तीच्या प्रमाणात आणखी जागा मिळाल्या पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खेरीज, राज्य मंत्रिमंडळात दुसऱ्या स्थानी आणि पक्ष संघटनेत प्रथमस्थानी चंद्रकांत पाटील असल्याने ते पक्षाच्या जागा वाढवून घेतील, असा ठाम विश्वास निवडणुकीची तयारी केलेले अर्धा डझन इच्छुक  व्यक्त करीत आहेत. अपेक्षा मोठय़ा आणि त्या पूर्ण करणे तितकेच कठीण असल्याने त्यावर चंद्रकांत पाटील कोणता उपाय शोधतात यावर म्हाडा अध्यक्ष समरजित घाटगे (कागल) यांच्यापासून ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (कोल्हापूर) यांच्यासारख्या अनेक प्रमुखांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. दुसरीकडे खुद्द चंद्रकांत पाटील कोणत्या आखाडय़ात उतरणार याबाबत त्यांनी अदूनही स्पष्टीकरण केलेले नाही. कोल्हापूर उत्तर, त्यांचे मूळ गाव असलेले राधानगरी आणि दक्षिणचे टोक चंदगड ही नावे आघाडीवर असली तरी पाटील यांनी कल स्पष्ट न केल्याने तेथील इच्छुकांचीही घालमेल सुरू आहे.

युतीत जागावाटपावरून अस्वस्थता

जिल्ह्य़ात शिवसेनेची गाडी वेगात आहे. विधानसभेतील गेल्यावेळचे दणकेबाज यश आणि लोकसभेला मिळालेले निर्भेळ यश यामुळे शिवसेनेचा आत्मविश्वस दुणावला आहे. विद्यमान सहा जागा आणि युतीच्या वाटपातील कागल व चंदगड या दोन्हीवरील आपला हक्क सोडण्याची शिवसेनेची तयारी नाही. सध्याच्या जागा आणि गेल्या वेळी वाटय़ाला आलेल्या अन्य दोन मतदारसंघात सेनेचा प्रारंभिक प्रचार सुरू झाला आहे. जिल्ह्य़ात सर्वात प्रबळ पक्ष अशी शिवसेनेची प्रतिमा असतानाही आमदार, इच्छुकांची अवस्था ‘आहे मनोहर तरी’ अशी आहे. भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाल्याने राज्यस्तरीय जागावाटपात त्यांच्या शब्दाला मान असल्याने काही जागांवर पाणी सोडावे लागण्याची भीती काहींना सतावू लागली आहे. शिवसेनेचे अन्य आमदार इतर पक्षांतून आलेले आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, राजेश क्षीरसागर हे एकटे मूळचे शिवसेनेचे असून त्यांना पक्षातून आणि मित्रपक्षांकडून ज्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे ते पाहता धक्का देण्याची रणनीती असल्याची खुलेआम चर्चा कोल्हापुरात आहे. खेरीज, चंद्रकांत पाटील यांनी एखादा मतदारसंघ निवडला तर आपले राजकीय भवितव्य काय, या विचाराने सेनेचे काही आमदार अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे वातावरण अनुकूल असतानाही जिल्ह्य़ात भाजप- शिवसेनेत जागावाटपावरून अस्वस्थता आहे.

काँग्रेस थंड- राष्ट्रवादीत फूट

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडून आले, तर काँग्रेसला खाते उघडता आले नाही. लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे दोन्ही उमेदवार पराभूत झाले. राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्याऐवजी त्यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभुळकर यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. याचवेळी नागपूर सासर असलेल्या बाभुळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. महाडिक -कुपेकर यांच्याशिवाय पुढे जाताना राष्ट्रवादीला अडचणी असताना जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि माजी अध्यक्ष के. पी. पाटील या मेहुण्यांमध्ये राधानगरीसाठी संघर्ष सुरू आहे. काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, सतेज पाटील, जयवंतराव आवळे, पी. एन. पाटील यांनी स्वत:च्या मतदारसंघापुरता प्रचार सुरू केला आहे. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज हे कोल्हापूर उत्तरमधून रिंगणात उतरण्याच्या निर्णयाप्रत आले आहेत.

स्वाभिमानी, वंचित आणि महापूर

कोल्हापूर जिल्ह्य़ात युती आणि आघाडी यांच्यात सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी स्पर्धा रंगली असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना, वंचित बहुजन आघाडी यांच्या भूमिकांबरोबरच महापूरही निकालावर परिणाम करण्याची चिन्हे आहेत. स्वाभिमानी आणि वंचित यांची साथ मिळाली तर काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलासा मिळू शकतो. महापुरामुळे शहराला मोठी झळ बसली आहे, तर अवघा गावगाडा कंगाल बनला आहे. पूरग्रस्तांचा विश्वास जो जिंकेल तो सरस ठरेल.

राज्यातील भाजप- शिवसेना सरकारची गेल्या पाच वर्षांतील कामगिरी निराशाजनक आहे. या सरकारने विकासाला तिलांजली दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी कर्जमाफी, बेरोजगारी, महापुराचे संकट असे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे ठाकले असून ते मार्गी लावण्यात सरकार अपयशी ठरले आहे. लोकांना पुन्हा आघाडीचे सरकार हवे आहे, त्यामुळे जिल्ह्य़ात ८ जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा विजय होईल.

– हसन मुश्रीफ, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

कोल्हापूर जिल्ह्य़ातील भाजप-शिवसेनेची ताकद वाढली असल्याचे लोकसभा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीतून स्पष्ट झाले. या यशामुळे युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. उलट, विरोधक पराभूत मानसिकतेत आहेत. मनाने हरलेले रणातजिंकणार नाहीत आणि गेल्यावेळेप्रमाणे युतीला धवल यश मिळेल.

– सुरेश हाळवणकर, आमदार-प्रदेश सरचिटणीस, भाजप

मतदारसंघनिहाय जागा

कोल्हापूर उत्तर –    शिवसेना

कोल्हापूर दक्षिण –   भाजप

करवीर – शिवसेना

कागल – राष्ट्रवादी

राधानगरी –    शिवसेना

चंदगड – राष्ट्रवादी

इचलकरंजी –   भाजप

शिरोळ – शिवसेना

पन्हाळा-  शिवसेना

हातकणंगले –   शिवसेना