साताऱ्यामधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एकीकडे विधानसभेचे चुरस सुरु असतानाच साताऱ्यामध्ये लोकसभेच्या पोट निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला जोरदार झटका दिला. लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या उदयनराजे भोसलेंचा पराभव झाला आहे. ९५ हजारहून अधिक मतांनी राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. उदयनराजेंच्या पराभावाबद्दल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पहिली प्रितिक्रिया दिली आहे.

साताऱ्यामधून विधानसभेची निवडणूक जिंकलेल्या शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजेंच्या पराभवावर बोलताना पक्ष म्हणून आत्मपरिक्षण करण्याची भाजपाला गरज आहे असं मत व्यक्त केलं आहे. “विधानसभेच्या सहा मतदारसंघांचा मिळून लोकसभेचा एक मतदारसंघ होतो. आम्ही पक्ष म्हणून आमच्या भागामध्ये काम केलं पण बाकी ठिकाणी काय झालं, मताधिक्य का नाही मिळालं या गोष्टींच पक्ष म्हणून आत्मपरिक्षण, आत्मचिंतन करणं गरजेचं आहे,” असं शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत.

त्याचप्रमाणे मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यास ती समर्थपणे पार पडू असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला आहे. “भाजपाकडून मी मंत्रीपदासाठीचा शब्द घेतला नव्हता. मंत्रीपद द्या तर मी येतो असं करुन मी भाजपामध्ये आलो नाही. मी कोणत्याही अटी आणि शर्ती ठेऊन भाजपात दाखल झालो नाही. जर दिली जबाबदारी तर चांगलं काम करेन. तेवढी माझी क्षमता आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर ज्याला ज्या जबबादाऱ्या दिल्या जातील त्याप्रमाणे काम करु. सरकारमध्ये राहून मतदारसंघांमध्ये चांगलं काम नक्की करेन,” असं शिवेंद्रसिंहराजे म्हणाले आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला विजय हा माझा एकट्याचा विजय नसल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे. “मतदारसंघामध्ये केलेलं काम, मतदारसंघात असणारा संपर्क, माझ्या वडिलापासून आमच्या घरण्यावर येथील मतदारसंघातील लोकांचा असणारा विश्वास, पक्ष म्हणून भाजपाने मागील पाच वर्षामध्ये केलेली कामे, मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाचा प्रभाव, कार्यकर्त्यांनी दिवसरात्र केलेले काम यामुळे हे यश मिळाले. चौथ्यांदा मी आमदार म्हणून निवडून आलो आहे,” असं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये सातारा मतदारसंघातील अनेक महत्वाची कामे हाती घेणार आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यांची दूर्दशा झाली आहे त्यासाठी निधी मिळून काम करणार आहे असं शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केलं आहे.

पवारांच्या सभेने परिणाम झाला नाही

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पावसातील सभेमुळे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल पालटला असं वाटतं का या प्रश्नावर शिवेंद्रसिंहराजे यांनी नाही असं उत्तर दिलं. “शरद पवारांच्या त्या एका सभेमुळे लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला असं मी म्हणणार नाही. असं असतं तर तिथे विधानसभेच्या रिंगणात असणारे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे पडले नसते. महेश शिंदे नवखे असून त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या जिल्ह्यातील मोठ्या नेतृत्वाचा पराभव केला. सभेचा प्रभाव असता तर मलाही इतकं मताधिक्य मिळालं नसतं,” असं मत शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केलं आहे.