X
X

फॉर्म्युला : मुख्यमंत्रीपद सेना-राष्ट्रवादीकडे; उपमुख्यमंत्री काँग्रेसचा!

READ IN APP

महामंडळे आणि समित्यांचे समसमान वाटप

राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. ‘एबीपी माझा’ने दिलेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

राज्यामधील सर्व महामंडळे आणि समित्यांचे समसमान वाटप केली जाईल असंही या बैठकीत ठरल्याचे समजते. तसेच कोणत्या व्यक्तीला मुख्यमंत्री निवडायचे हा निर्णय प्रत्येक पक्ष घेऊ शकतो असंही ठरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे कुटुंबातील व्यक्तीला मुख्यमंत्रीपदावर बसवण्यास विरोध होत असल्याचे वृत्त होते. मात्र दोन्ही काँग्रेसने शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या निवडीबद्दल आमचा कोणताही आक्षेप नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे शिवसेना कोणत्याही व्यक्तीला अडीच वर्षांसाठी या पदावर बसवू शकते.

भाजपाबरोबर युती करुन विधानसभा निवडणुक लढलेल्या शिवसेनेने युतीला बहुमत मिळाल्यानंतर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्यात यावे अशी अट घातली होती. मात्र भाजपने ती अट मान्य केली नाही. त्यामुळेच आत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांकडे जवळपास सारख्याच जागा असल्याने पद आणि जबाबदाऱ्यांचे समान वाटप करण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी घेतल्याचे समजते.

दरम्यान आजही राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे. येथे राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार हे पक्षाच्या आमदारांशी संवाद साधून त्यांचे मत जाणून घेणार आहेत.

22
X