युतीच्या उमेदवारांविरोधात बंडखोरीचे प्रमाण जास्त; उल्हासनगरात राष्ट्रवादीकडून तीन अर्ज

ठाणे जिल्ह्य़ामध्ये युतीच्या जागा वाटपाचा फटका बसलेल्या शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी बंडखोरी केली असून कल्याण पश्चिमेतून भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार तर कल्याण पुर्वेतून शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अशाचप्रकारे अंबरनाथमध्ये शिवसेना, भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे तर उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादी पक्षातर्फे तीनजणांनी अर्ज दाखल केले आहेत. तसेच कल्याण ग्रामीण मतदार संघामध्ये शिवसेनेतर्फे दोनजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत सोमवारी, ७ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. त्यापूर्वी या बंडखोरांचा बंदोबस्त कसा करायचा, याची खलबते आता राजकीय पक्षांच्या गोटात सुरू आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात एकूण १८ विधानसभा मतदार संघ आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बंडखोरी टाळण्यासाठी काही उमेदवारांची नावे उशीरा जाहीर करण्यात आली. मात्र, त्यानंतरही राजकीय पक्षांना बंडखोरी रोखण्यात फारसे यश आलेले नाही. राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्यामुळे नाराज झालेल्या इच्छूकांनी शुक्रवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. युतीच्या जागा वाटपामध्ये कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेकडे केली.त्याचा फटका भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना बसला. त्यामुळे शुक्रवारी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची डोकेदुखी वाढवणार आहे. कल्याण पूर्वेतून भाजपचे गणपत गायकवाड यांनी युतीतर्फे उमेदवारी अर्ज भरला असून या मतदार संघातून शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय बोडारे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून बंडखोरी केली आहे.

कल्याण ग्रामीण मतदार संघातून शिवसेनेने विद्यमान आमदार सुभाष भोईर आणि ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे या दोघांना पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली असून या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने याठिकाणी अधिकृत उमेदवारीचा घोळ आहे. उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीतर्फे भरत गंगोत्री यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर आमदार ज्योती कलानी आणि ओमी कलानी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. या दोघांनीही राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज

दाखल केला आहे. त्यामुळे या बंडखोरांना शांत कसे करायचे असा प्रश्न सर्वच पक्षांच्या नेत्यांना पडला आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. या मतदार संघातून भाजपला रामराम ठोकणारे सुमेध भवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपात असलेले माजी पोलिस अधिकारी दिलीप जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपतून शिवसेनेत आलेले सुबोध भारत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.

शिवसेनेत नाराजी..

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहीला असताना गुरूवारी रात्री शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना कळवा-मुंब्य्राची उमेदवारी देण्यात आली. शुक्रवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये काहीशी नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पक्षाच्या आदेश हा अंतिम असतो. त्यामुळे दिपाली सय्यद यांना उमेदवारी दिल्यामुळे कोणीही नाराज नाही, असे कळव्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची वेळ

ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी आणि ओवळा-माजिवाडा या मतदार संघातील उमेदवारांची नावे गुरूवारी रात्री काँग्रेसने जाहीर केली. त्यामध्ये कोपरी-पाचपखाडीतून हिरालाल भोईर तर ओवळा-माजिवाडा विक्रांत चव्हाण यांच्या नावाचा समावेश होता. मात्र, शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच काँग्रेस पक्षाने हिरालाल भोईर यांच्याऐवजी संजय घाडीगावकर यांना उमेदवारी दिली. वैयक्तीक कारणास्तव भोईर यांनी निवडणुक लढण्यास नकार दिल्याने हा निर्णय घेण्यात आला. माजी नगरसेवक घाडीगावकर यांनी काही वर्षांपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष निवडणुक लढविण्याची तयारी सुरू केली होती. असे असतानाच काँग्रेसने पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी दिली. पाच वर्षांपुर्वी भिवंडी पुर्व मतदार संघातून भाजपच्या तिकीटावर संतोष शेट्टी यांनी निवडणुक लढविली होती. मात्र, यंदा युती झाल्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेली आहे. त्यामुळे काँग्रेसमधून उमेदवारी मिळावी यासाठी संतोष शेट्टी यांचे प्रयत्न सुरु होते. मात्र, शेट्टी यांना उमेदवारी दिली तर पक्षात बंडखोरी होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊ काँग्रेसने शेवटच्या दिवशी शेट्टी यांना  उमेदवारी अर्ज दिला.