अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे असं शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. भाजपाने जर अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं नाही तर आमच्यापुढे सगळे पर्याय खुले आहेत असंही सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे. आज मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करेल अशी प्रतिक्रिया दिली.

प्रफुल्ल पटेल यांच्या या प्रतिक्रियेबाबत विचारलं असता अब्दुल सत्तार म्हणाले ” आमच्यापुढे सत्तास्थापनचे सगळे पर्याय खुले आहेत. भाजपाने आमचं ऐकलं नाही तर इतर वाटाघाटी आम्ही करु शकतो. राष्ट्रवादीचे नेते आत्ता जे काही सांगत आहेत त्याबाबत मी आत्ता काहीही बोलणार नाही ८ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीसोबतचं चित्र स्पष्ट होईल” असं सूचक वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. इतकंच नाही भाजपासोबत गेल्यास अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री ही काळ्या दगडावरची रेघ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

आता अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात काय नवी समीकरणं पाहण्यास मिळणार याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान याबाबत भाजपाच्या नेत्यांची प्रतिक्रिया घेतली असता शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही ठरलेलं नाही असं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. जी काही चर्चा अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात झाली त्यानुसारच महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत रावसाहेब दानवे यांनी हे म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले या निवडणूक निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५४ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेच्या जागा गेल्या वेळच्या तुलनेत कमी झाल्या असल्या तरीही त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. त्यामुळे आपल्या अटी शर्थींसहच ते भाजपाला पाठिंबा देतील ही बाब उघड आहे. आज अब्दुल सत्तार यांच्या सूचक वक्तव्याने ते अधोरेखित झालंय असंही म्हणता येईल.