राज्यात सत्तापालट झालं असून शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन महाविकासआडीचं सरकार स्थापन केलं आहे. उद्धव ठाकरे सरकारने बहुमत चाचणी दरम्यान बहुमत विश्वास ठरावही जिंकला आहे. उद्धव ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आता शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करतील असा जनतेमध्ये विश्वास आहे. लोकसत्ता ऑनलाइने फेसबुक आणि ट्विटरवर घेतलेल्या सर्वेक्षणात सात हजाराहून अधिक जणांनी मत नोंदवलं. फेसबुकवर सहा हजार ४०० पैकी ७२ टक्के लोकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शपथविधी घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दोन दिवसांत शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. “शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर लवकरच भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार असून त्यासाठी आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजना व त्यांच्या अंमलबजावणीचा वास्तववादी लेखाजोखा मंत्रिमंडळासमोर सादर करण्याची सूचना प्रशासनाला करण्यात आल्याचे,” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर जाहीर केले होते. यानंतर लोकसत्ता ऑनलाइनने पोल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीची घोषणा करतील का ? असा प्रश्न विचारला होता.

फेसबुकवर सहा हजार ४०० जणांनी आपलं मत नोंदवलं असून यावेळी ७२ टक्के वाचकांनी होय असं उत्तर दिलं असून उद्धव ठाकरे कर्जमुक्तीची घोषणा करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर २८ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं आहे.

तर ट्विटरवर एक हजार ६८ जणांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ट्विटरवर ६८ टक्के वाचकांनी होय असं उत्तर दिलं असून ३२ टक्के वाचकांनी उद्धव ठाकरे अशी घोषणा करणार नाहीत असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं होतं की, “राज्यात ज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या योजना आणि त्यांचे वास्तवातील चित्र मंत्रिमंडळासमोर मांडावे, असे मुख्य सचिवांना सांगितले आहे. शेतकऱ्यांसाठी खूप योजना जाहीर होतात, घोषणांचा पाऊस पडतो. पण त्यांच्या पदरात पडतात असे नाही. कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले पण खात्यात पैसेच जमा झाले नाही, असे अनेक प्रकार राज्यातील दौऱ्यात समोर आले. आम्हाला शेतकऱ्यांना नावाला नाही तर भरीव मदत करायची आहे. त्यामुळे वास्तववादी चित्र पाहून शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेऊ”. दरम्यान आता उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसंबंधी काय निर्णय घेतात हे पहावं लागणार आहे.