03 March 2021

News Flash

उद्धव ठाकरे सरकारची परीक्षा, उद्या पार पडणार बहुमत चाचणी

महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पदभारही स्विकारला आहे. मात्र उद्या उद्धव ठाकरे सरकारची खरी परीक्षा असणार आहे. उद्या विधानसभेत बहुमत चाचणी पार पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत देण्यात आली होती. बहुमत सिद्ध झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. दरम्यान दिलीप वळसे पाटील यांची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बहुमत चाचणी पार पडणार आहे. शनिवारी कामकाज सुरु झाल्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नेमणूक केली जाईल. यानंतर बहुमत चाचणी पार पडेल.

उद्धव ठाकरेंनी स्वीकारला पदभार
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारणार असल्याने सकाळपासूनच मंत्रालय परिसरात लगबग सुरु होती. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी यावेळी, “आता खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली आहे, आज फक्त शुभेच्छा देऊयात, कोणतंही इतर भाष्य नको” सांगत बोलणं टाळलं.

शिवाजी पार्कात पार पडला शपथविधी
शिवसेनेची स्थापना आणि प्रसार ज्या शिवाजी पार्कवरून झाला त्याच ठिकाणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाच्या शेजारी उभारलेल्या भव्य व्यासपीठावर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली. या शपथविधीमध्ये मराठवाडा वगळता सर्व भागांतील मंत्र्यांना संधी मिळाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2019 4:10 pm

Web Title: shivsena cm uddhav thackeray floor test maharashtra assembly ncp congress bjp sgy 87
Next Stories
1 “आज बाळासाहेब नक्कीच…”; नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आनंद महिंद्रांचे ट्विट
2 दिलीप वळसे पाटील विधानसभेचे हंगामी अध्यक्ष
3 “लोक झोपेत असताना नाही, लोक आवर्जून पाहतील असा शपथविधी!”
Just Now!
X