उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच गुरुवारी पहिली मंत्रीमंडळ बैठक घेत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी हे सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल, कुणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही असं आश्वासन दिलं. मात्र यावेळी एका प्रश्नावरुन उद्धव ठाकरे आणि पत्रकारामध्ये खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं.
उद्धव ठाकरे यांना एका पत्रकाराने किमान समान कार्यक्रमात धर्मनिरपेक्षा शब्दाचा उल्लेख करण्यात आला असून शिवसेना आता धर्मनिरपेक्ष झाली आहे का? अशी विचारणा केली. यावर उद्धव ठाकरे यांनी धर्मनिरपेक्ष म्हणजे काय हे तुम्हीच सांगा असं पत्रकाराला सांगितलं. यावर पत्रकाराने मी प्रश्न तुम्हाला विचारला असून तुम्ही उत्तर द्या असं म्हटलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी मी सांगणार नाही, तुम्हीच सांगा असं म्हटल्याने खडाजंगी झाली.
वाद वाढत असल्याचं लक्षात येताच पत्रकार परिषदेत उपस्थित असणाऱ्या छगन भुजबळ यांनी मध्यस्थी केली आणि धर्मनिरपेक्ष हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत असल्याची माहिती दिली. किमान समान कार्यक्रम संविधानावर आधारित आहे असंही यावेळी त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि इतर नेतेही हजर होते.
महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात आहे. मी मुख्य सचिवांना जी मदत दिली आहे गेली त्याची माहिती देण्याचा आदेस दिला आहे. एक ते दोन दिवसात ते चित्र स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तुटपुंजी नाही तर मोठी मदत करणार असून येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली. घोषणांचा पाऊस झाला, मात्र पदरात काही पडलेलं नाही हे आम्हाला समजलं आहे असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 29, 2019 10:32 am