मुस्लिम शासक मोहम्मद घोरी जसा कृतघ्नपणे वागला तेच धोरण भाजपाने अवलंबलेलं आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे. हिंदू राजे पृथ्वीराज चौहान आणि मोहम्मद घोरी यांच्यात १८ छोटी-मोठी युद्धं झाली. त्यातल्या १७ युद्धांमध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला. मात्र प्रत्येकवेळी पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीला जीवदान देऊन सोडून दिले. हीच चूक त्यांना महागात पडली.

शेवटच्या युद्धात मोठी तयारी करुन आलेल्या मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला. त्यांनी वेळोवेळी दिलेली जीवदानं विसरुन घोरीने कृतघ्नपणा केला. पृथ्वीराज चौहान यांना अटक केली. त्यांचे हालहाल केले. महाराष्ट्रातही आम्ही अशा विश्वासघातकी आणि कृतघ्न प्रवृत्तीला अनेकदा जीवदान दिले. आज हीच प्रवृत्ती शिवसेनेवर पाठीमागून वार करण्याचा प्रयत्न करते आहे. शिवरायांच्या महाराष्ट्र पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना सहजासहजी सोडणार नाही अशी टीका शिवसेनेने केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

भाजपा आता हा बोभाटा करते आहे की शिवसेनेने काँग्रेससोबत संबंध जोडले आहेत. आम्ही विचारतो, असे काही घडताना दिसत असेल राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक बोलवून याबाबत शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही? म्हणजे चोर कोण व ढोंगी कोण याची शहानिशा समोर आली असती. मात्र शिवसेनेच्या प्रखर माऱ्यापुढे तुमचे ढोंग टिकले तर ना? काश्मीरमध्ये राष्ट्रदोही तसेच पाकड्यांचे गोडवे गाणाऱ्या मेहबुबा मुफ्तींशी सत्तेसाठी निकाह लावताना भाजपाने एनडीएने परवानगी घेतली होती का? पाक पुरस्कर्त्यांना एनडीएच्या बैठकीत मानाच्या खुर्च्या देताना परवानगी घेतली होती का? असाही प्रश्न शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.