सत्ताबाजारात मटका लागावा म्हणून भाजपाची आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे. अशावेळी राज्यपालांनी राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे असं शिवसेनेने म्हटलं आहे. नाही म्हणायला एक काळजीवाहू नामक सरकार जरुर आहे. पण या सरकारच्या डोक्यात सत्तास्थापनेसाठीचे आकडे कसे वाढतील याचाच विचार आहे. यापेक्षा खरंतर अवकाळी पावसाने ग्रासलेल्या शेतकऱ्याला द्यायचे सरकारी मदतीचे आकडे महत्त्वाचे आहेत. मात्र तसे होताना दिसत नाही. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाबाबत बोलताना शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून ही टीका करण्यात आली आहे.

काय म्हटले आहे अग्रलेखात?
राज्यात सध्या सरकार नावाची गोष्टच अस्तित्त्वात दिसत नाही. जनादेश मिळूनही सत्ते असलेले अद्याप नवे सरकार स्थापन करु शकलेले नाही. नाही म्हणायला एक काळजीवाहू नामक सरकार जरुर आहे. पण या सरकारच्या डोक्यात सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या पाठिंब्याचे आकडे कसे वाढतील याचा विचार जास्त आहे. अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला द्यायचे सरकारी मदतीचे आकडे महत्त्वाचे आहेत. मात्र सत्ताबाजारात लागणाऱ्या आकड्यांची जुळवाजुळव सुरु आहे.

अशात अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांची भेट राज्यपालांनी घ्यावी आणि या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही शिवसेनेने केली आह. शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई मिळावी या उद्देशाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने अग्रलेखातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असं मह्टलं आहे.

सत्तेच्या राजकारणापेक्षाही अडचणीत सापडलेल्या अन्नदात्याला वेळेत मदत करणे याला अधिक प्राधान्य असले पाहिजे असे आम्ही मानतो. कारण आमची बांधिलकी समजाशी आणि शेतकऱ्यांशी आहे. पंचनाम्याचे जे काही सोपस्कार असतील ते लवकर पार पाडा, अटी शर्थींच्या जाचक तरतुदी दूर करा आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या असेही शिवसेनेने म्हटले आहे.