विजय चौगुलेंची गळाभेट तर इतर पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती; नाहटा यांचे बंड थंड

निवडणुकीपूर्वीच रिंगणाबाहेर फेकले गेलेले माजी मंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी नाटय़मयरीत्या ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी मिळवत शुक्रवारी मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र यानिमित्त नवी मुंबई शिवसेनेतील दरी चव्हाटय़ावर आली. उमेदवारी अर्ज भरताना शिवसेनेचे अनेक पदाधिकारी अनुपस्थित राहिले. मात्र, पालिकेचे विरोधपक्षनेते विजय चौगुले यांनी मात्र नाईकांची गळाभेट घेत त्यांच्यातील बारा वर्षांपूर्वीचे वैर संपल्याचे सूचित केले.

युतीच्या जागवाटपात नवी मुंबईतील दोन्ही जागा भाजपच्या वाटय़ाला गेल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेला मोकळी वाट करून देण्यासाठी पक्षाचे शहरप्रमुख विजय माने यांनी बेलापूर येथून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, तर शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी ऐरोली येथून गणेश नाईक यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. नाहटा यांच्या सानपाडा येथील निवासस्थानी गुरुवारी अनेक शिवसैनिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे गणेश नाईक यांना नाहटा यांचे आव्हान उभे राहील, अशी चर्चा होती. परंतु नाहटा यांनी ऐनवेळी माघार घेतली.

नाहटा यांनी सर्व तयारी सुरू केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निकटवर्तीयाने रात्री उशिरा मुख्यमंत्र्याना लघुसंदेश पाठवून या बंडखोरीची कल्पना दिली. मुख्यमंत्र्यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून नाहटा यांना बंडखोरी न करता युती धर्म पाळण्याची अपेक्षा व्यक्त केली. नाईकांपेक्षा भाजपसाठी ही एक जागा महत्त्वाची असल्याची कल्पनाही यावेळी देण्यात आली. त्यानंतर ‘मातोश्री’वरून शिवसेनेच्या नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना बंड न करण्याची तंबी देण्यात आल्याचे समजते.  नाहटा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत करण्यास तयार होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने ऐरोलीतून अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला पण नाहटा यांना मातोश्रीवरून आदेश आल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.

मंदा म्हात्रेंना ‘ताप’

गेली अनेक वर्षे माजी मंत्री गणेश नाईक व आमदार मंदा म्हात्रे या एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक, मात्र आज ते एकाच पक्षातील विधानसभेचे नवी मुंबईतील दोन मतदारसंघांतील दोन उमेदवार आहेत. त्यामुळे पुढील काळात त्यांचे मनोमीलन हा चर्चेचा विषय आहे. गुरुवारी मंदा म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला त्या वेळी गणेश नाईक, आमदार संदीप नाईक व माजी खासदार संजीव नाईक उपस्थित नव्हते. सागर नाईक मात्र या वेळी उपस्थित होते. त्यामुळे गणेश नााईकांचा अर्ज भरताना मंदा म्हात्रे येणार का? याची उत्सुकता होती. मात्र त्याही उपस्थित राहिल्या नाहीत. भाजप अध्यक्ष रामचंद्र घरत यांनी त्या आजारी असल्याने आल्या नसल्याचे सांगत सारवासारव केली.

गणेश नाईक यांचे शक्तिप्रदर्शन

या राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर गणेश नाईक यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. या वेळी मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी भाजपचे राज्य प्रभारी संजय उपाध्याय, नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, साबू डॅनियल, श्याम महाडिक, अनंत सुतार, जे.डी. सुतार आदी नाईक समर्थकांसह काँग्रसमधून नव्याने भाजपमध्ये आलेले दशरथ भगत व निशांत भगत यांनीही उपस्थिती लावली. या वेळी गणेश नाईक यांचे विरोधक विजय चौगुले यांनीही हजेरी लावली. मात्र, मित्रपक्ष शिवसेनेचे अनेक नेते अनुपस्थित होते. ऐरोली शिवसेनाअध्यक्ष द्वारकानाथ भोईर, शिवराम पाटील असे काही पदाधिकारी उपस्थित होते. त्यामुळे शिवसेनेतील दरी नाईकांच्या शक्ती प्रदर्शनात पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आली.

गुरु-शिष्य एकत्र

गणेश नाईक व विजय चौगुले हे  पूर्वीचे गुरु-शिष्य. मात्र, चौगुले सिडको संचालक असताना जमवलेली संपत्ती, झोपडपट्टी भागात प्रति दादा होण्याचा केलेला प्रयत्न  आशा अनेक विषयांमुळे नााईक व चौगुले यांच्यात  दरी निर्माण झाली होती. ती शुक्रवारी गणेश नाईक यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने दूर झाली. चौगुले यांनी नाईकांना निवडून आणण्याचा विडा उचलला आहे.