– शेखर जोशी

सत्तास्थापनेचा खेळ आता अधिकाधिक रंगतदार होत चालला आहे. आज रात्रीपर्यंत राष्ट्रवादीला आकड्यांची जुळवाजुळव करायची आहे. ती जुळवाजुळव राष्ट्रवादी करु शकले नाहीत तर कदाचित भाजप राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊ शकतो. (२०१४ ची परतफेड). शेवटी हे राजकारण आहे आणि राजकारणात काहीही घडू शकते. यातून शिवसेनेचा परस्पर काटा काढला जाईल. शिवसेनेवर तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी वेळ आणायची संधी भाजपला आयतीच मिळते आहे. सत्ता स्थापनेच्या या खेळात शिवसेनेची गोची झाली आहे.

पण कदाचित भाजप राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करणारही नाही. आधीच दोन्ही काँग्रेसच्या आयारामांना पक्षात प्रवेश दिल्याने भाजपने तत्व गुंडाळून ठेवल्याची टीका रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, हितचिंतक, कट्टर भाजपप्रेमी यांच्याकडून झाली होती, अनेकांनी ‘नोटा’चा वापर करून आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता भाजप राष्ट्रवादीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा देईल असे वाटत नाही. भाजपही थांबा आणि वाट पाहा च्या भूमिकेत आहे.
राष्ट्रवादीने शिवसेनेला आम्हाला पाठिंबा द्या असे सांगितले आणि शिवसेनेने पाठिंबा दिला तरी हसं त्यांचेच होणार आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेस म्हणाली की मुख्यमंत्री आमचाच आणि काँग्रेस, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ, तर शिवसेना काय करणार? पदरात काहीही न पडता राष्ट्रवादीमागे फरफटत जावे लागणार आहे. यात शिवसेनेचीच छी थू होणार आहे. एकूण शिवसेनेची सगळीकडून गोची करुन टाकण्यात आली आहे.

राष्ट्रवादीलाही आकड्यांची जुळवाजुळव करता आली नाही तर राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने वाटचाल सुरु होईल. अशा परिस्थितीत भाजप पुन्हा शिवसेनेच्या कोर्टात चेंडू ढकलू शकतो. राष्ट्रपती राजवटीची नामुष्की टाळण्यासाठी, पुन्हा निवडणुकीची वेळ येऊ नये म्हणून आमच्या बरोबर या. नाहीतरी आपली निवडणूकपूर्व युती झालेली आहेच. महाराष्ट्राच्या हितासाठी झाले गेले विसरुन जायला आम्ही तयार आहोत, असे भाजप म्हणू शकते. शिवसेनेने हे ऐकले तर चांगलेच आहे, नाही ऐकले आणि पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागले तर त्याचे सारे खापर शिवसेनेवरच फोडता येणार आहे. एकुणात शिवसेनेला बरोबर कात्रीत पकडले गेले आहे.

सत्ता स्थापन करण्याचा खेळ फिस्कटला तर राष्ट्रपती राजवट लागू होईल. काही महिन्यांनी भाजप पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा दावा करेल. दरम्यानच्या काळात शिवसेनेतील एखाद्या गटाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे केंद्रात भाजपचे सरकार आहे. सोनिया, पवार यांच्या अनेक फाईली बाहेर काढल्या जाऊ शकतात. ईडीची चौकशी लावून तुमचाही चिदंबरम करू, अशी भिती घालून दोन्ही काँग्रेसला सरकार स्थापनेपासून दूर ठेवले जाऊ शकते. आणि यातून पुन्हा एकदा भाजप, शिवसेना एकत्र येऊन फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात. राजकारण असेच धक्कादायक असते, कधीही काहीही घडू शकते.

शरद पवार, सोनिया गांधी यांना कर नाही त्याला डर कशाला असे वाटत असेल तर दोन्ही काँग्रेसनी शिवसेनेला बरोबर घेऊन खुशाल सत्ता स्थापन करावी. पण पवार, सोनिया यांचेही हात दगडाखाली अडकलेले असल्याने ते होणार नाही. काँग्रेसही पवार यांच्यावर किती विश्वास ठेवेल याचीही खात्री देता येत नाही. त्यामुळे काहीही कारणे काढून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणे टाळतील. आणि जरी समजा एकत्र आले तरी तीन पायांच्या शर्यतीचे हे सरकार फार काळ टिकणार नाही असे वाटते.