महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात २०१९ची विधानसभा निवडणूक रंगदार ठरली. निकालांपासून ते सत्तास्थापनेपर्यंत अनेक अचंबित करणाऱ्या घटना घडल्या. अचानक मुख्यमंत्रीपदावर विराजमान झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारही चार दिवसात पडले. त्यामुळे महाविकास आघाडीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी तीन विचारांच्या पक्षांच्या आघाडीमुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने पक्षाचा राजीनामा दिला आहे. माझी विचारधारा मला काँग्रेससोबत जाण्याची परवानगी देत नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे.

निवडणूक निकालानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रीपद विभागून देण्याची मागणी केली. त्याला भाजपाकडून नकार देण्यात आला. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीतील वाढला. दोन्ही पक्षातील संवादच थांबल्यानं कुणाचं सरकार येणार असं वातावरण राज्यात निर्माण झालं होतं. मात्र, शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससमोर सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला. दोन वेगळ्या विचारधारांचे पक्ष एकत्र येत असल्यानं त्याला सुरूवातीला विरोध सुरू झाला. शिवसेनेसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्येही दोन गट पडले होते. मात्र, अखेर तिन्ही पक्षांची सोबत येण्यावर सहमती झाली. त्यानंतर भाजपाचं सरकार कोसळून महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार आहे.

पण, काँग्रेससोबत जाण्यावरून शिवसेनेतही एक नाराजीचा सूर असल्याचं दिसत आहे. मुंबईतील एका शिवसैनिकानं युवा सेना आणि शिवसेनेच्या पदाचा राजीनामा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. रमेश सोळंकी असं त्यांचं नाव असून, त्यांनी शिवसेना सोडत असल्याची घोषणा केली आहे. “मी युवा सेनाच्या पदाचा आणि शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला, मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे आभार, असं सोळंकी यांनी म्हटलं आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली वयाच्या १२व्या वर्षी शिवसेनेत कामाला सुरूवात केली. १९९८ अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर पक्षातील अनेक पदांवर हिदुत्वाच्या विचारधारेनं काम करत राहिलो. या काळात अनेक चढ-उतार मी पाहिले. हिंदुराष्ट्र आणि काँग्रेसमुक्त भारत या उद्देशानं मी काम करत होतो. माझी सद् विवेक बुद्धी आणि विचारधारा काँग्रेससोबत काम करण्याची परवानगी देत नाही. मी काँग्रेससोबत काम करू शकत नाही, असं सोळंकी यांनी म्हटलं आहे.