महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेकडून सातत्याने पक्षाची भूमिका मांडणारे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ निवासस्थानी रवाना झाले आहेत. एकूणच राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेकडून दबावाचे राजकारण सुरु आहे.  थोडयाचवेळापूर्वी रामदास आठवलेंनी शरद पवारांना भेट घेतली. दुसऱ्याबाजूला मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं काही ठरलं नव्हतं या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता.

दरम्यान हे वक्तव्य मागे घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार होतो आहे असं समजतं आहे. याच वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं जाईल आणि जो दोन पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी या वाटाघाटी सुरु आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचे कुठलेही संकेत दिलेले नाहीत. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे ऐवढेच शरद पवार म्हणत आहेत.

त्यामुळे कोंडी फुटून शिवसेना-भाजपामध्ये चर्चा सुरु होणार? की, महाराष्ट्र राष्ट्रपती राजवटीकडे जाणार ते लवकरच स्पष्ट होईल.