शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून राज्यातील घडामोडींवर सूचक वक्तव्य करणारी ट्विट करत आहेत. असंच एक ट्विट त्यांनी आज सकाळी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी ‘अब हारना और डरना मना है,’ असं म्हणत एक वाक्य पोस्ट केलं आहे.
राज्यामध्ये तीन आठवडे उलटून गेल्यानंतरही कोणत्याही पक्षाला सत्तास्थापनेत यश आलेले नाही. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे आमंत्रण दिल्यानंतर त्यांना सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळेच मंगळवारी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मागील दोन दिवसांपासून बैठकी सुरु असून राज्यामध्ये दोन्ही काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राऊत यांनी एक सूचक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटला ‘अब हारना और डरना मना है,’ असं कॅप्शन देतं ‘हार हो जाती है जब मान लिया जाता है, जीत तब होती जब ठान लिया जाता है’ असं वाक्य पोस्ट केलं आहे. यामधून त्यांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत येईल असा सूचक इशारा द्यायचा आहे.
अब हारना और डरना मना है.. pic.twitter.com/mMCZyQmr84
— Sanjay Raut (@rautsanjay61) November 14, 2019
आज सकाळी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. शिवसेना आणि भाजपामध्ये बंद दरवाज्याआड जी काही बोलणी झाली, ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का सांगितली नाही, असा सवाल त्यांनी यावेळी केला. तसंच ही बोलणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत झाली. ती खोली आम्हाला मंदिरासमानच आहे. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो आम्ही खोटं बोलणार नाही, असा घाणाघात राऊत यांनी यावेळी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 2:10 pm