राज्यात कोणाचं सरकार येणार याचं चित्र अद्यापही स्पष्ट नसून वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. दरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी राज्यात शिवसेना पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचंच सरकार येणार असं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांना शिवसेना एकडी पडली आहे असं वाटतं का? विचारला असता त्यांनी मला असं वाटत नाही असं सांगितलं.
यावेळी मनोहर जोशी यांनी शिवसेनेसोबत वेगवेगळे पक्ष एकत्र येत असून, वातावरण बदलत असल्याचं म्हटलं. लोकांच्या मनात शिवसेनेबाबात सद्भभावना निर्माण होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच काँग्रेस शिवसेनेला समर्थन देण्यासंबंधी विचारलं असता, आपण त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही असं उत्तर त्यांनी दिलं.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली. यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असून, राज्याची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.
काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.
काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.
काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना सादर करू शकली नाही. सरकार स्थापण्याची तयारी केलेल्या सेनेच्या अपेक्षांवर यातून पाणी फिरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 12:50 pm