शिवसेनेच्या आमदारांनी ठराव मंजूर करुन महाराष्ट्रात सरकार स्थापनेसंबंधी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांची रंगशारदा हॉटेलमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षप्रमुखांच्या निवासस्थानापासून हे हॉटेल जवळ आहे.

भाजपाकडून आमदारांची फोडाफोडी होऊ नये म्हणून कालपासून शिवसेना आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्यात येईल अशी चर्चा होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना आज सकाळी याबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये हलवण्याची शक्यता फेटाळून लावली होती. शिवसेनेचे आमदार फोडण्याची कोणाची हिंमत नाही असेही संजय राऊत म्हणाले होते.

पण कुठलाही धोका नको म्हणून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये हलवण्यात आले आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व आमदारांनी एकत्र असणे आवश्यक आहे. उद्धवजींचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे असे आमदार सुनील प्रभू म्हणाले. महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. महायुतीने एकत्र निवडणूक लढवली होती. त्यांच्याकडे बहुमत आहे. पण मुख्यमंत्रीपद सत्तेतील वाटयावरुन दोघांमध्ये वाद सुरु आहेत. याआधी कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स रंगले होते. आता त्याचाच पुढचा अंक महाराष्ट्रात दिसत आहे.