|| जागावाटपानंतरही उमेदवार अनिश्चित; बंडखोरी रोखण्याचे भाजपसमोरही आव्हान

ठाणे जिल्ह्य़ातील १८ पैकी नऊ जागा आपल्या पदरात पाडून घेणाऱ्या शिवसेनेला उमेदवार निश्चित करताना मात्र नाकीनऊ येऊ लागले आहे. कळवा-मुंब्रा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात तगडा उमेदवार शोधताना दमछाक झालेल्या शिवसेना नेत्यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्यापुढे या मतदारसंघाचा प्रस्ताव मांडल्याचे वृत्त आहे. मात्र, भोईर यांनी या प्रस्तावाला बगल देऊन आपल्या मूळ मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

दुसरीकडे, हट्ट करून कल्याण पश्चिमची जागा मिळवणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांना येथून उमेदवारी कुणाला द्यायची, याचे उत्तर मात्र अद्याप सापडलेले नाही, तर कल्याण पश्चिमेत विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांना डावलल्याने भाजपमध्येही बंडाचे वारे वाहू लागले असून पवार गुरुवारी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता असून पवार यांना रोखावे यासाठी शिवसेना नेते थेट मुख्यमंत्र्यांकडे आर्जव करत आहेत. अंबरनाथ मतदारसंघातही भाजपचे स्थानिक नेते विद्यमान आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात जाहीरपणे वक्तव्य करत असून ठाणे शहर मतदारसंघात शिवसेनेतील एक मोठा गट मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांच्याशी संधान साधून असल्याच्या चर्चेमुळे भाजप नेते सावध झाले आहेत.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात सुभाष भोईर हे आमदार असून पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिल्याने त्यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. असे असले तरी भोईर यांना उमेदवारी देण्यास शिवसेनेतील एका मोठय़ा गटाचा तीव्र विरोध आहे. पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघातून डोंबिवलीचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे बंडाच्या पवित्र्यात होते. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे म्हात्रे यांचे बंड शमले आणि सुभाष भोईर सुदैवी ठरले. यंदा मात्र म्हात्रे नेत्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसून पालकमंत्री शिंदे यांच्या काही निकटवर्तीयांचाही भोईर यांना उमेदवारी देण्यास विरोध असल्याचे समजते. दिवा शहरातील शिवसेनेचा एक मोठा गटही भोईर यांच्या विरोधात असल्याने त्यांनी कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवावी असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. मात्र, भोईर यांनी पक्षनेतृत्वाचा हा प्रस्ताव पायदळी तुडवत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून अर्ज दाखल केल्याने बंडाच्या पवित्र्यात असलेल्या शिवसैनिकांना कसे थोपवायचे, असा प्रश्न पालकमंत्र्यांपुढे आहे.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पक्षाने पुन्हा अधिकृत उमेदवारी दिली असून या मतदारसंघातून अर्जही दाखल केल्याचे शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी सांगितले. तर सुभाष भोईर यांना पक्षाने एबी अर्ज दिला असला तरी तो भरण्यास सांगितले नव्हते. मात्र, तरीही त्यांनी उमेदवारी अर्ज भरलाआहे. त्यामुळे लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

कळवा-मुंब्य्रातून कोण?

कळवा-मुंब्रा मतदारसंघातून लढण्याची पक्षाची सूचना धुडकावून सुभाष भोईर यांनी कल्याण ग्रामीणमधूनच अर्ज दाखल केल्याने आता शिवसेनेचा उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे सुधीर भगत, राजेंद्र साप्ते, प्रदीप जंगम यांच्या नावाची चर्चा आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले तरी शिवसेनेने कळवा-मुंब्रा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेला नाही.

कल्याण पश्चिममधून प्रकाश पाटील?

कल्याण पश्चिमेतही शिवसेनेत उमेदवारीवरून अस्वस्थता असून या ठिकाणी शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या नावावर शिक्कामोतर्ब केले जात होते. खासदार कपिल पाटील यांच्यासाठी प्रकाश पाटील यांनी मेहनत केली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी कपिल पाटील हेदेखील आग्रही आहेत. मात्र, कल्याण पश्चिमेतील स्थानिक शिवसैनिकांचा या नावास विरोध असल्याने येथेही उमेदवारीचा तिढा कसा सोडवायचा हा शिवसेनेपुढे प्रश्न आहे.