यंदाच्या निवडणुकीत पुणे शहरात शिवसेनेच्या वाट्याला एक ही जागा मिळाली नाही, यामुळे शिवसेना संपली अशी चर्चा काहीजण करत आहेत. अशा चर्चा करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे की, जागा मिळाली नाही. म्हणून कधीच शिवसेना संपणार नाही. आमची महायुती असून राज्यातील सर्व उमेदवार भाजपा आणि शिवसेनेचे असल्याचे सांगत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विरोधकांना सुनावले आहे.

नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे की, “यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपा, शिवसेना आणि घटक पक्षातील नेत्यांची अनेक वेळा चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जागा वाटप करताना मतभेद झाले पण मनभेद झाले नाही. या सगळ्याचे साक्षीदार भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. त्यामुळे भाजपा आणि सेनेत कोणत्याही जागेवरून वाद नाही हे सर्वांनी लक्षात ठेवावे”.

“राज्यात २०१४ रोजी महायुतीचे सरकार आल्यापासून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. यामुळे दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पहायला मिळत आहे,” असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. “राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ६४ हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे नागरिक अधिक सुरक्षित आहेत. तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी दोन हजार कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. महिलांसाठी अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले असून यातून महिला अधिकाधिक सक्षम होण्यास मदत झाली. आपणदेखील व्यवसाय करू शकतो, असा विश्वास महिलांमध्ये निर्माण करण्याचे काम सरकारने केले,” असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

तसेच पुढे त्यांनी सांगितलं की, “मागील कित्येक वर्षांपासुन प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारला यश आले आहे. तर आता धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावला जाणार असून त्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत”.