महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदी शिवसेनेचाच उमेदवार विराजमान होईल. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातील चित्र स्पष्ट होईल अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली. मुंबईमध्ये आज राऊत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांनी आदित्य ठाकरेंबद्दलही महत्वाचे विधान केले.

सत्तावाटपासाठी आज काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईत शिवसेनेशी चर्चा करणार आहेत. त्यापूर्वी राऊतांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे यांच्या नावाला शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पसंती आहे असं सांगतानाच त्यांनी आदित्य यांच्या नेतृत्वाबद्दलही भाष्य केलं. “आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. याबद्दल पक्षांच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली का?”, असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी “आदित्य ठाकरेंचे नेतृत्व सर्व महाराष्ट्राला मान्य आहे. असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असं तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत आहे. त्याप्रमाणे जनतेच्या मनाचे, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या इच्छेप्रमाणे महाराष्ट्राच्या मनातील सरकार राज्यामध्ये स्थापन होईल,” असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

भाजपाला टोला

भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याची चर्चेसंदर्भातील प्रश्नावरही राऊत यांनी उत्तर दिले. “अशा पद्धतीची कोणताही ऑफर आम्हाला दिलेली नाही. तसेच आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपद काय तर इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही,” असा टोला राऊत यांनी भाजपाचे नाव न घेता लगावाला. “शिवसेनेनं घेतलेला हा निर्णय स्वाभिमानानं घेतलेला आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी घेतलेला आहे. लवकरच महाराष्ट्राला एक कणखर नेतृत्व मिळेल,” असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. राज्यामधील सत्तास्थापनेबद्दलचे चित्र आजच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल असंही राऊत यांनी यावेळी सांगितले. “राज्यात सध्या राष्ट्रपती शासन लागू आहे. त्यामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ती लवकरच पूर्ण केली जाईल. महाराष्ट्राची सत्ता ही दिल्ली चालवू शकणार नाही. असा प्रयत्न अनेकदा महाराष्ट्राने हाणून पाडला आहे,” असंही राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.