आम्ही ठरवलं तर आमचंच सरकार येईल आणि आमचाच मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान सिल्व्हर ओक येथे पोहोचले होते. या भेटीनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावत जर मुख्यमंत्री आपलं सरकार येणार सांगत असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो असं सांगितलं.

“मुख्यमंत्री आपलं सरकार येणार सांगत असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. आपल्याकडे लोकशाही आहे. ज्या पक्षाचं संख्याबळ जास्त आहे त्यांना सत्ता स्थापनेचा अधिकार असतो. पण जर शिवसेनेने ठरवलं तर शिवसेनेचेच सरकार आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

“शरद पवारांसोबत संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली. मुख्यमंत्र्यांचा शब्द न शब्द ऐकला असून उद्धव ठाकरेच यासंबंधी बोलतील,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं. काळजीवाहू सरकार आहे याचीच काळजी आहे असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. संजय राऊत यांनी यावेळी पुन्हा एकदा अडीच वर्षांच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती असा पुनरुच्चार केला.

“शिवसेनेकडून वैयक्तिक पातळीवर कोणतीही टीका झालेली नसून हे अत्यंत चुकीचं वक्तव्य आहे. आम्ही नेहमीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा आदर केला आहे,” असं सांगत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाचं खंडन केलं.