शिवेसना नेते संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या सहा जनपथ येथील निवासस्थानी संजय राऊत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आजच शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यामुळे संजय राऊत भेटीला पोहोचल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तापेचावर चर्चा होऊन काही तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सत्तास्थापनेवरुन शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरु नसल्याचं सांगितलं होतं.

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी होतं की, “महाराष्ट्रातल्या राजकीय पेचाबाबत सोनिया गांधी यांना माहिती दिली. मात्र या स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून असू”. महाराष्ट्रात सरकार स्थापण्यावर चर्चा झाली का? यावर शरद पवार यांनी नाही असं उत्तर दिलं. “शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही? सरकार स्थापन करायचं की नाही? या कोणत्याही प्रश्नांवर चर्चाच झाली नाही,” असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले. तसंच आघाडीतल्या मित्रपक्षांनाही नाराज करुन चालणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं.

सोनिया गांधी यांची भेट घेतली तेव्हा तिथे ए. के. अँटनीही हजर होते असंही शरद पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरकार स्थापनेचा पेच का सुटत नाही यावरच आम्ही चर्चा करतो आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जो काही पेच निर्माण झाला त्याबाबत सोनिया गांधी यांना मी माझ्या परिने माहिती दिली. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातला सत्तास्थापनेचा सस्पेन्स कायम आहे असंच दिसून येतं आहे.

यावेळी शरद पवार यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची सामायिक कार्यक्रम ठरवण्यासाठी सुरु असलेल्या बैठकांबद्दल विचारलं असता ही बैठक सरकार स्थापन का होत नाही यावर चर्चा सुरु असल्याचा दावा त्यांनी केला.