विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले तरी सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटू शकलेला नाही. मात्र आता हा तिढा सुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद देण्यासंबंधी काहीच चर्चा झाली नव्हती असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुखावले होते आणि तेथून या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली होती. मात्र आता हे वक्तव्य मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावर एक ड्राफ्ट तयार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं जाईल आणि जो दोन पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी या वाटाघाटी सुरु आहेत असं सूत्रांचं म्हणणं आहे.

दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी यासंबंधी बोलताना मसुदा वैगेरे काही नको सांगत फक्त मुख्यमंत्रिपदावर चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. मसुदा वगैरे काही नको, थेट मुख्यमंत्रिपदावर बोला असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे रंगशारदा हॉटेलमधील शिवसेना आमदारांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन नेण्याची तयारी सुरु कऱण्यात आली आहे. तसंच उद्धव ठाकरे या सर्व आमदारांशी संवाद साधणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर गेले दोन आठवडे सुरु असलेला सत्तासंघर्ष संपण्याची चिन्हे आहेत.

संजय राऊत यांनी याआधी सकाळी माजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची एक कविता ट्विट करत भाजपावर निशाणा साधला होता. तसंच त्याआधी बोलताना संजय राऊत यांनी भाजपा आणि शिवसेनेत कोणीही मध्यस्थी करण्याची गरज नाही असं म्हटलं होतं. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर उद्धव ठाकरे ठाम आहेत. जर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर तर हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय होईल असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. नितीन गडकरी शिष्टाई करणार का? असं विचारलं असता, मुख्यमंत्रीपदाचं लेखी पत्र घेऊन नितीन गडकरी येणार असतील तर माध्यमांचा निरोप मी उद्धव ठाकरेंना देतो असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. २४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत.