शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार असं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी केले. याच वक्तव्याचा खरपूस समाचार शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये घेतला. फडणवीस आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत असं मत मुनगंटीवर यांनी व्यक्त केले आहे यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राऊत यांनी मुनगंटीवारांची संपूर्ण पत्रकार परिषद पाहिली असल्याचे सांगितले. ते फडणवीस आणि उद्धव भाऊ असल्याचे म्हणत आहेत यावर तुमची प्रतिक्रिया काय असा सवाल पत्रकारांनी विचारला असता राऊत यांनी ‘मीही म्हणेल की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेनेत प्रवेश करावा,’ असं उत्तर दिलं.

“मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल हे आज आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला. युती तोडण्याचं पाप उद्धव ठाकरे करणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपा सत्तास्थापनेचा दावा का करत नाही?,” असा प्रश्न राऊत यांनी विचारला. त्यानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ‘फडणवीस आणि उद्धव ठाकरे भाऊ आहेत असं तुम्हाला वाटतं का?’ असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. “गोड बातमी त्यांच्याकडे असते. ते किती नाती जोडतात आणि किती जागी गोड जेवण जेऊ घालतात मला ठाऊक नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला. त्यानंतर त्यांना फडणवीस हे शिवसैनिक आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत असा दाखला मुनगंटीवार यांनी दिला आहे. यावर तुम्ही काय म्हणाल असा सवाल विचारण्यात आला. यावर उत्तर देताना राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना मी शिवसेनेत या असं म्हणेल ते येतील का? असा सवाल केला. “असं असेल तर मग मीही म्हणेल की नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी शिवसेनेत प्रवेश करावा ते करणार आहेत का? नाही ना. शाब्दिक कोट्या, अलंकार आणि भाषा वापरुन राजकारण होत नाही,” असं उत्तर राऊत यांनी दिलं. तसेच फडणवीस हे शिवसैनिक आहेत असा दावा करणाऱ्यांना उत्तर देताना राऊत यांनी “शिवसैनिक हा दिलेल्या शब्दाला जागतो, वचनाला जागतो. शिवसैनिक सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी खंजीर खुपसत नाही,” असं सांगत फडणवीस यांना टोला लगावला.

“आमदारांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये युती करताना ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्यापेक्षा जास्त मला काहीही नको” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच भाजपाने आता सत्तेची हाव सोडून द्यावी असंही संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. “भाजपाच्या साम दाम दंड भेदाला शिवसेना घाबरतेय का?,” या प्रश्नाला उत्तर देताना साम, दाम, दंड, भेद हा सत्तेचा माज आलेलेच वापरतात असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला हाणला. “आम्ही सामंजस्याचं राजकारण करतोय. साम दाम दंड भेद जोपर्यंत खुर्ची आहे तोपर्यंत चालतो. तसेच तो व्यक्तीचा नाही तर सत्तेचा असतो. सत्तेचा माज आणि मस्ती उतरते तेव्हा हे सारं गळून पडतं,” असंही राऊत म्हणाले.