भाजपास आता बहुमत मिळणे म्हणजे टोणग्याने दूध देण्यासारखे आहे. अजित पवारांच्या रुपाने त्यांनी एक टोणगा गोठ्यात आणून बांधला आहे आणि टोणग्याचे दूध काढण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ योजना आखली आहे अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादीशी बंड करत भाजपासोबत गेलेले अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. “देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने हे काय जन्मास घातले आहे? मुंडके गाढवाचे व धड रेडय़ाचे असा प्रकार महाराष्ट्राच्या माथी मारून हे लोक एकमेकांना लाडू भरवतात; पण लाडू भरवताना तो त्यांच्या नरडय़ाखाली उतरत नव्हता व चेहऱ्यावर आनंदाचा लवलेशही नव्हता. हे लाडू त्यांना पचतील काय, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर नाही असे आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी, ‘‘अजित पवारांना तुरुंगात चक्की पिसायला पाठवू’’ असे सांगणारे भगतगण ‘फडणवीस, अजित पवार आगे बढो’च्या घोषणा देत होते; पण अजित पवार त्या जल्लोषात कुठेच दिसत नाहीत. कारण राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्राची जनता ‘‘अजित पवार मुर्दाबाद’’च्या घोषणा देत आहे. सत्य असे आहे की, अजित पवारांचे बंड फसले आहे व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे,” असंही सांगितलं आहे.

“भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी तत्त्व, नीतिमत्ता वगैरे गुंडाळून ठेवली आहे. सत्तेसाठी कोणत्याही थराला व तळाला जाण्याची तयारी आहे. पण काही झालं तरी त्यांना विधानसभेत बहुमताचा आकडा गाठता येणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. “हेच लोक एरवी सत्ता हे साध्य वगैरे नाही अशी प्रवचने झोडत नैतिकतेचा आव आणतात. मग आता तुमच्याकडे बहुमत आहे, ते पाहूनच राज्यपालांनी शपथ दिली आहे असे तुम्ही म्हणत आहात ना? तर मग ही ‘ऑपरेशन कमळ’ची भामटेगिरी कशासाठी?,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

“आज राज्यात सर्वत्र भाजपची छीः-थू होत आहे. टोणग्याचे शेण भाजपच्या स्वच्छ, पारदर्शक वगैरे चेहऱ्यावर उडाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील अस्वस्थ झाले असावेत. राष्ट्रवादी काँग्रेस फोडून अजित पवार हे पंचवीस-तीस आमदार घेऊन भाजपच्या गोठ्यात येतील या भ्रमात फडणवीस व त्यांचे मंडळ होते. अजित पवार यांचे कथित बंड वाळूवर गाढवाने मुतावे व थोडी फसफस व्हावी तसे फसले आहे. महाराष्ट्रात जे घडवले जात आहे त्यास ‘नाटय़’ वगैरे म्हणणे म्हणजे रंगभूमीचा अपमान आहे. हातात सत्ता आहे, तपास यंत्रणा आहेत, भरपूर काळा पैसा आहे, त्या जोरावर राजकारणात हवा तो उन्माद घडवू शकतो असे कुणाला वाटत असेल तर शिवरायांच्या महाराष्ट्राचा तो अपमान आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“मुळात महाराष्ट्रावर हे जे राजकीय अस्थिरतेचे सावट पसरले आहे ते भारतीय जनता पक्षामुळे, त्यांच्या व्यापारी वृत्तीमुळे आणि फसवणुकीच्या कलेमुळे. आधी त्यांनी शिवसेनेसारखा मित्र गमावला व आता एखाद्या अट्टल चोराप्रमाणे रात्रीच्या अंधारात अपराध करीत आहेत. सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून राज्यपालांकडून भाजपास सरकार स्थापनेची संधी होती. राज्यपाल त्यांच्याच पक्षाचे आणि भूमिकेचे असल्याने मा. भगतसिंह कोश्यारी यांनी भाजप पुढाऱ्यांना आमंत्रित केलेच होते. त्यांनी नकार दिला. शिवसेनेस बोलावले; पण सत्तास्थापनेसाठी चोवीस तासही दिले नाहीत. त्यामुळे पडद्यामागे जे ठरले होते त्यानुसार राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लादली. अशा वेळी समविचारी नसले तरी महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसह काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याच्या जवळ येऊन ठेपताच भाजपच्या हृदयाचा ठोका चुकला व त्यांनी रातोरात अजित पवारांना हाताशी धरून शपथग्रहण सोहळा पार पाडला. हा सगळा पोरखेळ तर आहेच, पण महान महाराष्ट्राच्या परंपरेस काळे फासणारे प्रकरण आहे,” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

“इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी हा काळा दिवस वगैरे पाळण्याचे ढोंग आता भाजपवाल्यांनी करू नये. राष्ट्रपती भवन, राजभवनाचा इतका गैरवापर देशात त्या काळातही झाला नव्हता. महाराष्ट्र नीट जागा झाला नसताना भल्यासकाळीच फडणवीस व अजित पवार यांनी राजभवनात जाऊन शपथ घेतली. ते बहुधा आंघोळ न करताच पाहोचले असतील; पण राजभवनात सगळय़ांनी लोकशाहीच्या नावाने आंघोळ केली. सर्व संकेत धाब्यावर बसवून एखाद्या भामटय़ा, परागंदा झालेल्या चोराप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. या सोहळय़ास स्वतःचे पै-पाहुणे तर सोडाच, पण परंपरेप्रमाणे अधिकारीवर्गदेखील हजर नव्हता. राज्यपाल एरवी आमदारांची पत्रे, त्यांच्या सह्या वगैरेची शहानिशा केल्याशिवाय सत्तास्थापनेचे आमंत्रण देत नाहीत. शिवसेनेच्या बाबतीत ते घडले आहे, पण अजित पवार पक्ष कार्यालयातून चोरलेले सह्यांचे पत्र राज्यपालांना दाखवतात व राज्यपाल त्या कागदांवर विश्वास ठेवून फडणवीस व अजित पवारांना शपथ देतात. हा प्रकार म्हणजे हेराफेरीचा कळस आहे,” अशी संतप्त भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

“सत्य असे आहे की, अजित पवारांचे बंड फसले आहे व त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. अजित पवारांबरोबर बारा आमदार गेले. त्यातील नऊ आमदार परत आले. शरद पवार हेच नेते आहेत व राष्ट्रवादी काँग्रेस व महाराष्ट्र त्यांनाच आम्ही मानतो. 80 वर्षांच्या शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचे सामर्थ्य दाखवलेच, पण शिवसेनेबरोबर काँग्रेससह सत्तास्थापनेचे पाऊल टाकले. त्यात अजित पवार नावाची धोंड भाजपने फेकली, पण त्यांनी ती धोंडही दूर केली. यानिमित्ताने भाजपचा मुखवटा पुन्हा गळून पडला. अर्थात भाजपच्या चेहऱ्यावर इतके मुखवटे आहेत की, एक मुखवटा गळाला तरी दुसरा तेथे असतोच. त्यामुळे मुखवटे गळत राहिले तरी खरा चेहरा समोर येत नाही,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

“महाराष्ट्राची जनता हे सर्व मुखवटे ओरबाडून काढील. पंचवीस वर्षांच्या मैत्रीला न जागणारे लोक अजित पवारांचाही कडेलोट करतील. अजित पवारांनी भाजपच्या नादास लागून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना फसवले. भाजपने अजित पवारांना फसवले व सगळय़ांनी मिळून महाराष्ट्राला फसवले. या फसवणुकीसाठी राजभवनाचा गैरवापर झाला. हे पाप आहे. पण पाप-पुण्यापेक्षा सत्ता महत्त्वाची असे ज्यांना वाटते त्यांना शेवटची घरघर लागली आहे,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे