एक भगतसिंग देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेला इतकेच आम्ही जाणतो, तर दुसऱ्या भगतसिंगांच्या सही-शिक्क्याने रात्रीच्या अंधारात लोकशाही व स्वातंत्र्यास वधस्तंभावर चढवले अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामना संपादकीयच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकास्र सोडलं असून राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? अशी विचारणा केली आहे.

“शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून १६२ आमदारांचे पत्र राजभवनात आता सादर केले. हे सर्व आमदार राजभवनात राज्यपालांसमोर उभे राहायला तयार आहेत. इतके स्पष्ट चित्र असताना राज्यपालांनी कोणत्या बहुमताच्या आधारावर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली? या लोकांनी बनावट कागदपत्रे सादर केली व त्यावर घटनेचे रक्षणकर्ते असलेल्या भगतसिंग नामक राज्यपालांनी डोळे झाकून विश्वास ठेवला,” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

मग तीन पक्षांच्या आमदारांनी आपल्या सही-शिक्क्यांनिशी जे पत्र दिले, त्यावर मा. भगतसिंग राज्यपाल महोदयांची काय भूमिका आहे? अशी विचारणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे. “महाराष्ट्रात जे घडले ती ‘चाणक्य–चतुराई’ किंवा ‘कोश्यारीसाहेबांची होशियारी’ असे म्हणणे हे सर्वस्वी चूक आहे. आमदारांचे अपहरण करणे व दुसऱ्या राज्यात नेऊन डांबून ठेवणे ही कसली चाणक्य नीती?,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीलाच सुरुंग लावला – उद्धव ठाकरे
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष दोनवेळा सोडला व स्वतःचा नवा पक्ष हिमतीने उभा केला. पन्नास वर्षे संसदीय राजकारणात टिकून राहणे सोपे नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे, वादळे झेलून ते उभे राहिले, पण भाजपने खटले दाखल करताच व ‘ईडी’च्या नावाने ब्लॅकमेल करताच अजित पवार यांनी शरद पवारांच्या राजकीय इस्टेटीलाच सुरुंग लावला व त्यातला माल चोरून ते भाजपच्या वळचणीला गेले. एका जुन्या पत्राचा आधार घेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ गट ताब्यात ठेवण्याची लटपट करीत आहेत व अजित पवारच कसे खरे अशी बतावणी भाजपचे नेते करीत आहेत. ‘‘हा अजित पवार कधी खोटं बोलत नाही’’ असं अजित पवार कालपर्यंत भाषणात सांगत, पण आता ते रोज खोटं बोलत आहेत. मुळात राज्यपालांनाच त्यांनी खोटे पत्र दिले आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.