04 March 2021

News Flash

अविश्वसनीय करुन दाखवणार – उद्धव ठाकरे

काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना राज्यपालांकडे सादर करू शकली नाही

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठबळावर सत्ता स्थापन करण्याचा दावा सोमवारी शिवसेनेने राज्यपालांकडे केला असला तरी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर करण्यास पक्षाला अपयश आले. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून पत्र प्राप्त न झाल्याने १४५ पेक्षा जास्त सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र शिवसेना राज्यपालांकडे सादर करू शकली नाही. यामुळे सरकार स्थापण्याची तयारी केलेल्या सेनेच्या अपेक्षांवर पाणी फिरले. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपण अविश्वसनीय करुन दाखवणार अशी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यानंतर तेथून निघताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांनी कमी वेळ दिला याची खंत बोलून दाखवली. याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत, राज्यपालांनी भाजपाला 48 तास आणि शिवसेनेला फक्त 24 तासांची मुदत दिल्याची सांगत कमी वेळ दिल्याची खंत व्यक्त केली होती.

सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि सायंकाळी एन्जिओग्राफी करण्यात आली. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ मॅथ्यू यांनी त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली.

पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळून राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी दिली आहे. यामुळे सत्ता स्थापनेचा घोळ सुरूच असून, राज्याची राष्ट्रपती राजवटीकडे वाटचाल सुरू आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करायचे, असा शिवसेनेचा प्रयत्न होता. यातूनच शिवसेनेने केंद्रातील सरकारमधून बाहेर पडावे, अशी अपेक्षा राष्ट्रवादी व काँग्रेसने व्यक्त केली होती. यानुसार केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. सरकार स्थापण्याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास विरोध झाला होता. पण राज्यातील नेत्यांची तीव्र भावना लक्षात घेता, पुन्हा बैठक बोलाविण्यात आली.

काँग्रेसने सुमारे साडेतीन तासांच्या बैठकीनंतरही काहीच निर्णय घेतला नाही. काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्र प्राप्त होईल, अशी चर्चा सुरू झाली. साडेसातपर्यंत राज्यपालांनी शिवसेनेला मुदत दिली होती. शिवसेना नेते पावणेसात वाजता राजभवनवर पोहोचले. पण काँग्रेसकडून पाठिंब्याचे पत्रच प्राप्त झाले नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा गृहीत धरून शिवसेनेने सरकार स्थापण्याचा दावाही केला होता. पण पाठिंब्याचे पत्र सादर करू शकले नाहीत.

काँग्रेसची बैठक रात्री आठपर्यंत सुरू होती. काँग्रेसने पाठिंब्याबाबत वेळेत पत्रच दिले नाही. काँग्रेसचे पत्र न आल्याने राष्ट्रवादीनेही राज्यपालांना पत्र दिले नाही. मित्र पक्षांनी तत्त्वत: मान्यता दिली असली तरी पत्र नंतर सादर करू, असे शिवसेनेच्या वतीने राज्यपालांना विनंती करण्यात आली. पण राज्यपालांनी पत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यास नकार दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2019 1:06 pm

Web Title: shivsena uddhav thackeray lilavati hospital sanjay raut maharashtra political criris sgy 87
Next Stories
1 महाराष्ट्रात शिवसेनेचंच सरकार येणार – मनोहर जोशी
2 संजय राऊत रुग्णालयात तरी चर्चेत, पहिला फोटो आला समोर
3 बेस्ट वसाहतीची दुरवस्था
Just Now!
X