शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मातोश्रीवर आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान बैठकीनंतर आमदारांची फोडाफोडी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल रंगशारदावर पाठवण्यात आलं आहे. सर्व आमदार दोन दिवस हॉटेल रंगशारदामध्ये राहणार आहेत.

बैठकीनंतर बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत असं सांगत भाजपाला आव्हान दिलं आहे. “कोणी माई का लाल आम्हाला फोडू शकत नाही. आमदार म्हणजे काही भाजीपाला नाही. हिंमत असेल तर आमचे आमदार फोडून दाखवावेत,” असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्रीपद देणार असाल तरच फोन करा – उद्धव ठाकरे</strong>
मला युती तोडायची नाही, त्यामुळे भाजपाने काय तो निर्णय घ्यावा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर ठाम राहिले. यामुळे भाजपा आणि शिवसेनेमधील तिढा अजून वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी लोकसभेची युती करताना जे ठरलं होतं ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाही असं सांगत मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं सांगितलं आहे.

बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या काही आमदारांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावर शिवसेना पदावर ठाम असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असं सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे शिवसैनिक, राज्याच्या हिताचा निर्णय घेतील असंही ते म्हणाले.

लोकसभेदरम्यान जे ठरलं होतं ते मान्य करण्यास भाजपा तयार झाली असती तर आपण चर्चेस तयार होतो असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितलं. जर आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास तयार असतील, तर त्यांनी आम्हाला फोन करावा अथवा करु नये असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.