लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला असून लवकरात लवकर तो जाहीर करु अशी माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. शिवेसना भवनात नेत्यांसोबत पार पडलेल्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. १३५-१३५ चा फॉर्म्युला मीडियानेच पसरवला असल्याचंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं. तसंच लवकरात लवकर आपण उमेदवारांची घोषणा करु असंही त्यांनी सांगितलं आहे. यावेळी शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

उद्धव ठाकरे यांना यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्या राम मंदिरासंबंधी केलेल्या वक्तव्यासंबंधी विचारलं असता मोदींनी केलेली विनंती रास्त आहे असं सांगितलं. “राम मंदिरासंबंधी मी कोणतंही वक्तव्य करत नसून फक्त भावना व्यक्त करत आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. न्यायव्यवस्था कोणत्याही हस्तक्षेपाला बळी न पडता न्याय देत असते. न्यायालयाकडून मिळालेला न्याय हा न्याय असतो. तो निष्पक्ष असतो,” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

तसंच आरे कारशेड आणि नाणार प्रकल्पासंबंधी विचारलं असता, “आरेतील वृक्षतोडीला आमचा विरोध आहे. पण महाराष्ट्राच्या विकासाला आम्ही पाठिंबा दिला आहे, विकासकामांना आम्ही कधीच विरोध केला नाही. आरे आणि नाणारसंबंधी जो विरोध आहे तो तेथील सामान्यांशी चर्चा केल्यानंतरच करण्यात आला आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. “तसंच शिवसेनेने गेल्या पाच वर्षात कधीही सरकारला दगा दिला नसून पाच वर्षांत झालेल्या विकासात शिवसेनेचा मोलाचा सहभाग असल्याचा आनंद असल्याचं,” त्यांनी म्हटलं आहे.