शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर दौरा करण्यात व्यस्त आहेत. बुधवारी उद्धव ठाकरे जेव्हा अहमदनगरमध्ये प्रचारसभेसाठी पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत धाकटा मुलगा तेजस ठाकरेदेखील उपस्थित होता. मंचावर तेजस ठाकरे उपस्थित असल्याने लवकरच राजकारणात अजून एक ठाकरे प्रवेश करत असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र उद्धव ठाकरे यांनी लगेचच त्यावर भाष्य करत हा दावा फेटाळून लावला.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बोलताना तेजसला प्रचारसभा पहायची होती म्हणून तो येथे आला असल्याचं सांगितलं. अहमदनगरमधील संगमनेर येथे ही सभा पार पडली. “तेजस फक्त प्रचारसभा पाहण्यासाठी आला आहे. तो घरापेक्षा जंगलातच जास्त वेळ घालवत असतो,” असं यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं,

ही निवडणूक शिवसेनेसाठी विशेष महत्त्वाची आहे. कारण या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील सदस्य निवडणुकीच्या रिंगणात आहे. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवत असून राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी ही एक लढत मानली जात आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्यासोबत धाकटे बंधू तेजस ठाकरेदेखील उपस्थित होते.

आणखी वाचा- Video: ‘तेजस अगदी माझ्यासारखाच’; जाणून घ्या का म्हणाले होते बाळासाहेब असं

तेजस ठाकरे राज्यातील पश्चिम घाटातील पर्वतरांगांमधील दुर्मिळ प्रजातीचा साप शोधल्याने चर्चेत आला होता. हा शोध लावल्याबद्दल सापाच्या या प्रजातीला ‘ठाकरे कॅट स्नेक’ असं नाव देण्यात आलं होतं. वैज्ञानिकी भाषेत सापाला बोईगा ठाकेरायी असं नाव देण्यात आलं आहे.