उद्धव ठाकरे यांची पुनर्घोषणा

अयोध्यामध्ये राम मंदिर झाले पहिजे, यासाठी शिवसेना आग्रही आहेच. त्याचबरोबर राम मंदिर उभारणीसाठी उठलेल्या हातांना कामही मिळाले पाहिजे, यासाठी सरकार अग्रभागी राहील, असे मत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केले.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यत आलेले ठाकरे यांनी दिवसभरात शिवसेनेचे उमेदवार आमदार उल्हास पाटील (जयसिंगपूर – शिरोळ), सत्यजित पाटील (सरूड – शाहूवाडी), संजय घाटगे, संग्राम कुपेकर (गडहिंग्लज-कागल, चंदगड) आणि राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचार सभा केल्या.

महापुरावर शाश्वत तोडगा

सभेत ठाकरे यांनी सरकारने केलेल्या विकासकार्याचा आढावा घेतानाच सत्तेवर आल्यावर कोणती कामे करणार याबाबत आश्वस्त केले. महायुतीच्या सत्ताकाळात सरकारने सामान्य जनतेच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत, असे नमूद करून ते म्हणाले,  कोल्हापूर-सांगली जिल्ह्यत महापुरामुळे होत्याचे नव्हते झाले  आहे. पुन्हा सत्तेत आल्यानंतर महापुरावर शाश्वत तोडगा काढणार आहे. शेतकऱ्याचा सातबारा कोरा, अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक दहा हजार रुपये, एक रुपयात आरोग्य सेवा आणि मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत यासह वचननाम्यातील सर्वच वचनांचे पालन करण्याचे आश्वासन ठाकरे यांनी दिले.

पवार निशाण्यावर

राज्यात भगवे सरकार सत्तेत आल्यानंतर विकासात्मक वचने ठेवली आहेत. गोरगरिबांना १० रुपयांत जेवन देण्याची योजना आहे. परंतु यावर शरद पवारांसारखे विरोधक टीका करत आहेत. चांगल्या कामात अडथळे निर्माण करत आहेत. परंतु आमच्यावर टीका करणाऱ्यांनी अगोदर स्वत:ची पात्रता तपासावी. तुम्हाला आव्हानच द्यायचे असेल तर समोर या, पाठीमागून वार करण्याची आमची औलाद नाही. समोर आलात तर माझी जनता वाघनखे घालून तुमचा बंदोबस्त करेल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधी भाजपला बिनशर्त पाठिंबा देणारे शरद पवार आता सरकारविरोधात बोलत असल्याबद्दल ठाकरे यांनी टीका केली. युतीचे सर्वत्र उमेदवार रिंगणात असताना त्यांच्या विरोधात अनेक बांडगुळं उभी असून त्यांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन त्यांनी केले.