विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची मागणी आहे. आम्ही त्या मागणीवर आजही ठाम आहोत. आम्हाला मतं मागण्यासाठी राम मंदिर नको आहे. लोकभावनेचा विचार करुन आम्ही ही मागणी करतो आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या निर्मितीचा निर्णय दिला तर ठीक नाही तर विशेष कायदा करा आणि राम मंदिर उभारा ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी ही मागणी केली.

धनुष्य-बाण ही निशाणी घेतली तेव्हा राम मंदिराचा विषयही नव्हता. आता हा विषय समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवा असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केली. कुणालाही वाटलं असेल तर शिवसेना युतीसाठी झुकली का? मात्र तसं मुळीच नाही, चंद्रकांत पाटील यांनी विनंती केली. आमची अडचण समजून घ्या. आम्ही वचन पाळणारी माणसं आहोत त्यामुळे आम्ही वचन पाळलं असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

भाजपाला पाठिंबा नाही द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा? कलम 370 काढू नका म्हणणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का? शरद पवार आणि इतर मंडळींचं टार्गेट जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपलं टार्गेट तेच लोक राहणार. शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा कोथळा काढू हे विसरु नका असंही उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. भाजपा आणि शिवसेनेची युती महाराष्ट्राने स्वीकारली आहे. जागावाटपावर जे टीका करत आहेत त्यांना माझं हे उत्तर आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

अजित पवार यांच्या राजीनामा नाट्याचाही उद्धव ठाकरेंनी खरपूस समाचार घेतला. अजित पवार यांच्या डोळ्यात अश्रू पाहून मला मगरीच्या डोळ्यातले अश्रू आठवले. अजित पवार हे म्हणतात राजकारणाचा स्तर खालावला आहे, तुमच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्ही आता शेती करणार म्हणता आहात, पण पाणी लागलं आणि धरणावर जायची गरज पडली तर काय करणार? आता तुम्ही रडता आहात, मात्र माझा शेतकरी जेव्हा तुमच्याकडे मदत मागायला आला होता तेव्हा तुम्ही धरणाच्या पाण्याबाबत काय वक्तव्य केलं? ते आठवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला.

सूडाचं राजकारण कुणी करणार असेल तर आम्ही त्यांना माफ करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. मात्र त्याचवेळी 2000 मध्ये काय झालं होतं बाळासाहेब ठाकरेंना अटक करु असा दबाव का आणला जात होता? त्यावेळी तुम्ही केलं ते सूडाचं राजकारण नव्हतं का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. तसंच शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली.